प्राची सोनवणे - नवी मुंबईमहिलांमधील संघटन व व्यावसायिक कौशल्य वाढविण्यामध्ये बचत गट चळवळीचा मोठा वाटा आहे. नवी मुंबईमध्येही बचतगट चळवळ वाढू लागली आहे. ५३७३ बचत गटांची नोंदणी झाली असून १ लाखपेक्षा जास्त महिला या माध्यमातून संघटित झाल्या आहेत. अनेक महिलांनी या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. बचत गट चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने २००९ पासून प्रयत्न सुरू केले. बचत गटांची नोंदणी करून त्यांना अनुदानही सुरू केले. सद्यस्थितीमध्ये ५३७३ बचत गटांची नोंदणी झाली आहे. प्रत्येक गटात १० ते २० महिलांचा सहभाग असून काही गटांमध्ये सदस्यांची संख्या यापेक्षाही जास्त आहे. या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. आपले घर सांभाळून उरलेल्या वेळात विविध खाद्यपदार्थ, मसाले, पापड, लोणची, शोभिवंत वस्तू, खेळणी, हातमागच्या वस्तू इत्यादी वस्तू तयार करतात. या वस्तू बाजारपेठेत विकतात. हल्ली या वस्तूंना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. या बचत गटांच्या माध्यमातून आज हजारो महिला रोजगार मिळवत आहेत. मिळालेल्या रोजगारातून कित्येक महिलांनी आपल्या संसाराला हातभार लावला आहे. बचत गटाच्या माध्यमातून मिळणाऱ्या मोबदल्यामधून या महिला आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करतात. नवी मुंबई परिसरातल्या बचत गटामधून तयार केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची लोकलमध्येसुद्धा विक्री केली जाते. नोकरीनिमित्त नवी मुंबईसारख्या शहरात स्थायिक झालेल्या तरुणांना घरचे जेवण चाखता येते. त्यांना या गटांच्या मदतीने रोजच्या रोज तयार होणारे घरगुती जेवण पुरविले जाते. सारसोळे गावातील सिद्धिविनायक महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या वेणूबाई विसावे यांच्या गटात २० महिला कार्यरत आहेत. गणपतीचे मोदक, दिवाळीचा फराळ, होळीची पुरणपोळी असे सणासुदीचे पदार्थ या बचत गटांच्या माध्यमातून तयार केले जातात. या गटांमार्फत नवी मुंबई परिसरातील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलांसाठी खाऊ पुरविला जातो. नेरुळ गावातील अनिता म्हात्रे यांच्या एकविरा स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या माध्यमातूनही खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. प्रदर्शनांच्या ठिकाणी आपले स्टॉल्स मांडून बचत गटाच्या या महिला आपल्या श्रमाचा मोबदला मिळवितात. आदर्श महिला स्वयं सहाय्यता समूह विविध वस्तू तयार करत आहेत.
चळवळ आर्थिक स्वावलंबनाची
By admin | Updated: March 8, 2015 00:38 IST