Join us  

घर खरेदी-विक्रीप्रकरणी खासगी बँकेला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 4:58 AM

बनावट दस्तावेजाच्या आधारावर घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारप्रकरणी खासगी बँकेला गंडा घालणाऱ्या प्रकाश मारू (वय ३२, रा. मीरा रोड) याला अटक केली आहे.

मुंबई : बनावट दस्तावेजाच्या आधारावर घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारप्रकरणी खासगी बँकेला गंडा घालणाऱ्या प्रकाश मारू (वय ३२, रा. मीरा रोड) याला अटक केली आहे.प्रकाशच्या बँक खात्यात २० लाख रुपये तर अन्य आरोपींपैकी हार्दिक गोठी याच्या बँकेच्या खात्यात ४० लाख रुपये वळविल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात तक्रारदार हे वांद्रेत राहणारे आहेत. त्यांनी आलिशान फ्लॅट विक्रीसाठी काढला होता. त्यासाठी तक्रारदारांनी मित्र अरिफ सय्यद याला सांगितले. आरिफ व इस्टेट एजंटला तक्रारदारांनी माहिती दिली. जून २०१७ मध्ये अब्दुल्ला खान उर्फ पप्पूने तक्रारदाराशी संपर्क साधून मित्र नरेंद्र अगरवाल याला हा फ्लॅट घेण्यात रस असल्याचे सांगत फ्लॅट दाखवला. हा फ्लॅट ५ कोटी ४२ लाख रुपयांना विकण्याचे ठरले.अगरवालने कर्ज घ्यावे लागेल असे सांगितले.त्या वेळी नरेंद्रचा मित्र राकेश चक्रवर्ती याने बँकेतून कर्ज काढण्याची तयारी दाखविली. टोकन म्हणून १० लाख देण्याचे ठरले. उर्वरित ५ कोटी ३२ लाख कर्ज काढून देण्याचे ठरल्यावर कर्जप्रक्रिया सुरू झाली. २० जूनला राकेशने १० लाख खात्यावर ट्रान्स्फर केले. त्यानंतर घर विक्रीचा अनोंदणीकृत करारनामा झाला. राकेशने बँकेने ४ कोटी ११ लाख कर्ज मंजूर केल्याचे सांगितले. काही रक्कम कमी असल्याने व्यवहार रद्द करा, असे तक्रारदाराने सांगितले. त्या वेळी उर्वरित रक्कम दिल्यानंतर कॅन्सलेशन डीड करण्याचे सांगितले. तक्रारदाराने नऊ ब्लँक चेक चक्रवतीला दिले. दलाल पप्पूला ८ लाख ८० हजारांचे तीन धनादेश दिले. बँकेत ४ कोटी पाच लाख जमा झाले होते. ही रक्कम जमा होताच राकेशने मारबलेक्स सिटी इन्फ्रा, विदेही डायकेम, प्रकाश हिराराम, वैदेही सहकारी पेठ, श्री साई सी फूड्स, हार्दिक गोठी, नरेंद्र अगरवाल, खाते क्रमांक ००२००००२४९४३५ आणि चामुंडा इंटरप्राईझेस या नऊ बँक खात्यांत चार कोटी पाच लाख रुपये वळविण्यात आले आणि तक्रारदार असलेल्या घरमालकाला गंडा घालण्यात आला. तक्रारदाराने या व्यवहारानंतर राकेशला फोन करून कागदपत्र मागितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली.