Join us  

छत्तीसहून अधिक अधिकाऱ्यांनी केली घटनेची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 5:58 AM

वडिलांनी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली.

मुंबई : चेंबूर सामूहिक बलात्कार प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांसह गुन्हे शाखाही समांतर तपास करत आहे. आतापर्यंत तरुणी व संशयितांच्या मोबाइल कॉल रेकॉर्डसह विविध बाजू पोलिसांनी पडताळून पाहिल्या आहेत. ३६ हून अधिक अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली. अद्याप ठोस धागा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रहिवासी असलेली १९ वर्षीय तरुणी चेंबूर परिसरात भाऊ, भावजयीकडे राहण्यासाठी आली. तिला आकडीचा त्रास होता. त्यात एचआयव्हीसारख्या दुर्धर आजाराने ती ग्रस्त होती. तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून भावाकडे पाठविण्यात आले होते. मात्र, प्रकृती खालावल्याने वडिलांनी तिला २५ जुलै रोजी औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (घाटी) दाखल केले. त्या वेळी बलात्कार झाल्याचे समोर आले. ७ जुलै रोजी मैत्रिणीच्या वाढदिवसावरून परतताना चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याचे तिने कुटुंबीयांना सांगितले. त्यानुसार, बेगमपुरा पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करत, हे प्रकरण २७ तारखेला चुनाभट्टी पोलीस ठाण्यात वर्ग होताच, चुनाभट्टी पोलिसांसह गुन्हे शाखेने याचा समांतर तपास सुरू केला. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून तरुणी जबाब देण्याच्या मनस्थितीत नसल्याने, पोलिसांना नेमका घटनाक्रम माहिती नव्हता.

वडिलांनी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली. त्यातही मुलीच्या कॉल रेकॉर्डनुसार, १० ते ६ ती चेंबूरच्या लाल डोंगर परिसरातच असल्याचे दाखवते. संशयितांच्या कॉल रेकॉर्डनुसार, त्यांचे लोकेशन अन्य ठिकाणी दाखवले आहे. पोलीस उपायुक्त, साहाय्यक पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षकांसह ३६ हून अधिक अधिकाºयांनी या प्रकरणी चौकशी केली. मात्र, ठोस पुरावे हाती लागले नाहीत. तरुणीचा मृत्यू झाल्यामुळे पोलिसांसमोरील अडचणी वाढल्या.