Join us  

११ ते २० वयोगटांतील १ लाखांहून अधिक जण कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:07 AM

राज्यातील आकडेवारीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या २० लाखांहून अधिक आहे. या रुग्णसंख्येत सर्वाधिक प्रमाण ३१ ...

राज्यातील आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या २० लाखांहून अधिक आहे. या रुग्णसंख्येत सर्वाधिक प्रमाण ३१ ते ४० वयोगटांतील बाधितांचे आहे. नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या ६६ हजारांहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला, तर दुसरीकडे ११ ते २० वयोगटांतील १ लाख ३३ हजारांहून अधिक मुलामुलींना कोरोना झाला. एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण ६.६४ टक्के आहे.

राज्यात ३१ ते ४० वयोगटांत ४ लाख २३ हजार ३०८ कोरोनाबाधित आढळले. एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण २१.०८ टक्के आहे. त्या खालोखाल ४१ ते ५० वयोगटांत ३ लाख ६० हजार ४५० बाधितांची नाेंद झाली. २१ ते ३० वयोगटांत ३ लाख ३२ हजार ५२४ आणि ५१ ते ६० हजार वयोगटांत ३ लाख २६ हजार ४६१ बाधित आढळले.

एकूण बाधितांमध्ये ३ लाख ६४ हजार १५ एवढ्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोना झाला. यात सर्वाधिक २ लाख २२ हजार ७७८ बाधित ६१ ते ७० वयोगटांतील असल्याची नाेंद आहे, तर १०१ ते ११० वयोगटांत ही संख्या २४ रुग्ण आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे, राज्यात हळूहळू काेराेना नियंत्रणात येत असून, आता केवळ ४३ हजारांच्या आसपासच काेराेनाच सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

* रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२२ टक्के

- अतिजोखमीच्या आजारांमुळे बळी ७० टक्के, तर अन्य कारणांमुळे ३० टक्के मृत्यू.

- काेराेनाच्या एकूण रुग्णसंख्येत ६१ टक्के पुरुष, तर ३९ टक्के महिला रुग्ण.

- काेराेनाच्या एकूण मृत्यूंमध्ये ६५ टक्के पुरुष, तर ३५ टक्के महिलांनी गमावला जीव.

- राज्यात काेराेना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२२ टक्के

- राज्याचा मृत्युदर २.५३ टक्के

-------------------------