Join us  

आदेशाविनाच थांबली मोनोरेलची धाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 3:11 AM

गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेल बंद ठेवण्याचे कोणतेही आदेश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिलेले नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआयमध्ये समोर आली आहे

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेल बंद ठेवण्याचे कोणतेही आदेश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिलेले नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआयमध्ये समोर आली आहे. मोनोला कोणत्या कारणाने आग लागली होती, या प्रश्नावरही अद्याप तपासणी सुरू असल्याचेच उत्तर एमएमआरडीएने दिले आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून आगीचे कारण शोधण्यात प्रशासन निष्प्रभ ठरल्याचेच दिसत आहे.आरटीआयमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एमएमआरडीए प्रशासनाने अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. त्यात आगीचे मुख्य कारणच समोर आलेले नसताना प्रशासनाकडून फेब्रुवारीत मोनोरेल पुन्हा सुरू करण्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आगीचे कारण माहीत नसल्याने पुन्हा आग लागू नये, म्हणून काय खबरदारी घेणार, हे उत्तरही गुलदस्त्यातच आहे.माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, मोनोरेलमधून प्रशासनाला अंदाजे दररोज १ लाख २० हजार रुपयांची आवक असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा प्रकारे ८ नोव्हेंबर २०१७पासून बंद असलेल्या मोनोमुळे आत्तापर्यंत प्रशासनाचे अंदाजित ८४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाचे शासकीय माहिती अधिकारी व कार्यकारी अभियंता (मोनोरेल) यांनी आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांस ही माहिती दिली आहे.एमएमआरडीएने आदेश दिलेले नसताना नेमके कोणाच्या सांगण्यावरून मोनोरेलबंद ठेवण्यात आली, याचा तपासकरण्याची मागणी आरटीआय कार्यकर्त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएमआरडीएकडे केली.तसेच दोषी व्यक्तींकडून सदर नुकसानभरपाई वसूल करून घ्यावी, अशी मागणीही केली आहे."1,20,000 मोनोरेलमधून प्रशासनालादररोज होणारी अंदाजे आवक सर्वसाधारणपणे इतकी आहे."84,00,000 ८ नोव्हेंबर २०१७पासून बंद असलेल्या मोनोमुळे आत्तापर्यंत प्रशासनाला झालेले अंदाजित नुकसान.