Join us  

बंदर, गोदी कामगारांचा २८ मे रोजी देशव्यापी संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 5:03 AM

देशातील प्रमुख बंदरांमधील बंदर व गोदी कामगारांच्या संघटनांनी तयार केलेल्या आॅल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनने

मुंबई : देशातील प्रमुख बंदरांमधील बंदर व गोदी कामगारांच्या संघटनांनी तयार केलेल्या आॅल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनने २८ मे रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. कामगारांच्या वेतन कराराची मुदत ३१ डिसेंबर २०१६ रोजी संपली असूनही, पोर्ट ट्रस्ट प्रशासनाकडून कामगारांच्या वेतन करारास विलंब होत असल्याचा फेडरेशनचा आरोप आहे. मुंबई बंदरातील सर्व कामगार संघटना संपाच्या तयारीसाठी २५ मे रोजी दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान इंदिरा गोदीत आंबेडकर भवन येथे निदर्शने करतील.मान्यताप्राप्त कामगारांच्या महासंघाने कराराची मुदत संपण्याच्या ६ महिन्यांपूर्वी कामगारांच्या ६७ मागण्यांचे मागणीपत्र पोर्ट ट्रस्ट प्रशासनाला दिले होते. इंडियन पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्यासोबत महासंघाच्या नेत्यांनी सात वेळा बैठकाही घेतल्या. मात्र, शेवटच्या बैठकीत महासंघाने कामगारांसाठी ३५ टक्के फिटमेंटची मागणी केली असता, प्रशासनाने फक्त ६ टक्के फिटमेंट देण्याची तयारी दाखविली. अखेर महासंघाने २० टक्के फिटमेंटचा प्रस्ताव तडजोडीसाठी दिला आहे. १६ महिने झाले, तरी अद्याप वेतन करार होत नसल्याने गोदी कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. द्वीपक्षीय वेतन समितीची तातडी बैठक बोलावून, वेतन करार करण्याची मागणी फेडरेशनने केली आहे.