Join us  

सोनू निगम यांना मोहम्मद रफी पुरस्कार घोषित

By संजय घावरे | Published: December 22, 2023 9:20 PM

संतोष आनंद यांचा मो. रफी जीवनगौरव पुरस्काराने होणार सन्मान

गायक सोनू निगम यांना, तर 'इक प्यार का नगमा है...'सारखी अजरामर गाणी लिहिणाऱ्या गीतकार संतोष आनंद यांना मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार घोषित झाला आहे. २४ डिसेंबरला वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांच्या ‘स्पंदन’ संस्थेतर्फे मोहम्मद रफी पुरस्काराने संगीत क्षेत्रातील दिग्गजांच्या कार्याचा सन्मान करण्यात येतो. रफींच्या वाढदिवशी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवनगौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यंदाचे हे पुरस्काराचे १७ वे वर्ष आहे. एक लाख रुपये धनादेश, स्मृतिचिन्ह आणि शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ५१ हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे. संतोष आनंद यांच्या गीतांनी ७०च्या दशकात प्रेक्षकांना वेड लावले होते. या योगदानाबद्दल त्यांना ‘मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. आपल्या तीन दशकांपेक्षाही प्रदीर्घ कारकिर्दीत हिंदीसह मराठी तसेच इतर बऱ्याच भाषांमध्ये पाच हजारांहून अधिक गाणी गाणाऱ्या सोनू निगम यांना २०२३ चा ‘मोहम्मद रफी पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. 

यापूर्वी संगीतकार आनंद, गायक अमीत कुमार यांच्यासह ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर, शमशाद बेगम, संगीतकार रवी, शैलेंद्र सिंग, नौशाद अली, प्यारेलाल, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, खय्याम, संगीतकार उषा खन्ना, गायक उदित नारायण आदी कलावंतासह निवेदक अमिन सयानी यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मोहम्मद रफी यांचा ९९ वा वाढदिवस असून, त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असल्याने या पुरस्काराचे एक वेगळे महत्त्व असल्याची भावना आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :सोनू निगममोहम्मद रफी