Join us

मोदींचा सूट घेणाऱ्या कंपनीने उडविली झोप

By admin | Updated: May 27, 2015 01:51 IST

तीन दिवसांपासून मुंबई पोलीस आणि विमानतळ अधिकाऱ्यांना कोड्यात टाकणाऱ्या संशयास्पद तरंगत्या वस्तू म्हणजे निव्वळ गॅसचे पाच फुगे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई : तीन दिवसांपासून मुंबई पोलीस आणि विमानतळ अधिकाऱ्यांना कोड्यात टाकणाऱ्या संशयास्पद तरंगत्या वस्तू म्हणजे निव्वळ गॅसचे पाच फुगे असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे फुगे धर्मानंदन डायमंडस् प्रायव्हेट लिमिटेड (डीडीपीएल) ही हिऱ्यांची कंपनी व चार बँकांनी प्रायोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेदरम्यान सोडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वादग्रस्त ठरलेला सूट याच डीडीपीएलने ४.३१ कोटी रुपयांमध्ये विकत घेतला होता व तीच कंपनी ‘सुटाबुटा’तील सरकारच्या वर्षपूर्तीच्या दिवशी पुन्हा या फुग्यांच्या निमित्ताने चर्चेत आली. पोलिसांनी त्या कार्यक्रमाच्या व्यवस्थापकाला (इव्हेंट मॅनेजर) व हिऱ्यांच्या ब्रोकरला निष्काळजीपणाबद्दल अटक केली असून, आता अशा उडत्या गोष्टींची विक्री/वापरावरील मनाई आदेश पोलीस काढणार आहेत.काही प्रसारमाध्यमांनी हे बलून्स ड्रोन्स असावेत व ते विमानतळासारख्या संवेदनशील भागांची टेहळणी (रेकी) करीत असावेत किंवा त्याच कामासाठी ते दूरनियंत्रकाद्वारे हाताळले जाणारे पॅराशूटस् असावेत, असे वृत्त दिले होते. ‘लोकमत’ने अशा कोणत्याही अफवा बातम्यांद्वारे दिल्या नाहीत. त्या उडत्या वस्तू या कुठलाही उपद्रव नसलेले दिवे होते व त्यांच्यामुळे सुरक्षेला कोणताही धोका नव्हता, असे पोलीस अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.शनिवारी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या दिशेने पाच फुगे येत असल्याचे आढळताच चौकशीची चक्रे फिरली. त्यातून झालेला उलगडा असा- विमानतळाजवळच्या कालिना क्रिकेट मैदानावर आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान आनंदोत्सव म्हणून कार्यक्रमाच्या व्यवस्थापकाने ते फुगे हवेत सोडले होते. फुगे तरंगत होते, तो सगळा भाग ‘नो फ्लार्इंग झोन’ (उड्डाणविरहित क्षेत्र) असल्यामुळे आम्ही इव्हेंट मॅनेजर नीलेश श्रीमंकर आणि डायमंड ब्रोकर कुणाल शाह यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, असे पोलीस उपायुक्त वीरेंद्र मिश्र यांनी सांगितले. जेट एअरवेजच्या पायलटला या वस्तू दिसल्या व त्या पाच वस्तू नव्हत्या तर फुग्यांचे पाच घोस होते त्यामुळे त्याचा संशय अधिकच बळावला. ‘‘शाह आणि श्रीमंकर यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यावर त्यांना २ हजार रुपयांच्या हमीपत्रावर जामीन मंजूर करण्यात आला. आता आम्ही भारतीय दंड विधानाचे कलम १४४ अंतर्गत विमानतळानजीकच्या उड्डाणविरहित क्षेत्रात फुगेदेखील उडवायला मनाई करणारा आदेश जारी करणार आहोत, असे मिश्र म्हणाले. गॅस हवेपेक्षा कमी घन व हवेपेक्षा हलका (हेलियम किंवा हायड्रोजनसारखा) असलेल्या वायू भरलेले फुगे त्यातील गॅस संपत आला की आपोआप खाली येऊ लागतात.धर्मानंद डायमंडस्चे चेअरमन लालजी पटेल म्हणाले की, ‘‘सुरतमध्ये आम्ही दरवर्षी क्रिकेटचे सामने आयोजित करतो; परंतु या वर्षी प्रथमच ब्रोकर कुणाल शाहने मुंबईत सामना घेण्याचा आग्रह केला व आमचे प्रायोजकत्व मागितले. परंतु उड्डाणविरहित क्षेत्रात बलून्स उडवता येत नाहीत हे संघटकांना माहिती असायला हवे होते.