ना मोदी, ना राहुल... प्रकाश आंबेडकरांच्या मनात PMपदाचे वेगळेच दावेदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 02:51 PM2019-05-03T14:51:04+5:302019-05-03T14:54:00+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या दोघांपैकी कोणीही पंतप्रधान होणार नाही.

Modi, Rahul not to be PM, Deve Gowda is right candidate by prakash ambedkar | ना मोदी, ना राहुल... प्रकाश आंबेडकरांच्या मनात PMपदाचे वेगळेच दावेदार!

ना मोदी, ना राहुल... प्रकाश आंबेडकरांच्या मनात PMपदाचे वेगळेच दावेदार!

Next

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या दोघांपैकी कोणीही पंतप्रधान होणार नाही. माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे नेते एच.डी. देवेगौडा पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ठरतील, असे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी वर्तविले. असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमशी आघाडी करत प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील ४८ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यांच्या या भूमिकेवर उलटसुलट चर्चाही झाली. राज्यातील मतदानाचे चारही टप्पे पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पे्रस क्लब येथे आयोजित केलेल्या वार्तालापात प्रकाश आंबेडकर यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

भावी पंतप्रधानांबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, भाजपला १४८ ते २०० जागा मिळतील, तर काँग्रेस जेमतेम शंभरी गाठण्यापर्यंत मजल मारेल. त्यामुळे मोदी किंवा राहुल पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. अशा परिस्थितीत एच.डी. देवेगौडा हे या पदासाठी प्रबळ दावेदार ठरतील. देवेगौडांच्या पक्षाकडे पुरेसे संख्याबळ असेल का, अशी विचारणा केली असता त्यांच्याशिवाय अन्य कोणी सर्वसहमतीचा नेता नसल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. ममता बॅनर्जी, मायावती आदी प्रादेशिक पक्षांकडे तशी क्षमता आहे. मात्र, त्यांना सर्वांचा पाठिंबा मिंळेल अशी शक्यता नाही. अखिलेश यादव, नवीन पटनायक यांचीही तीच स्थिती आहे. देवेगौडांच्या पाठोपाठ तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे नाव चर्चिले जाईल, असे सांगतानाच शरद पवार १९९१ पासून पंतप्रधानपद मिळण्याच्या चर्चेत आहेत आणि चर्चेतच राहतील, असे ते म्हणाले.


राज्यातील निकालांबाबत सांगताना अनिश्चिततेची स्थिती असल्याचे सांगतानाच वंचित बहुजन आघाडीला राज्यात किमान दोन जागा मिळतील, असा दावा आंबेडकर यांनी केला. निकालानंतर वंचित आघाडी कोणत्या बाजूने जाईल यावर आम्ही भाजपविरोधात बसणार असल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले.
निश्चित धोरण आखावे
गडचिरोली येथील नक्षली हल्ल्याबाबत आंबेडकर म्हणाले, हिंसेने नक्षलवाद संपविता येणार नाही. त्यासाठी निश्चित धोरण आखावे लागेल. नक्षलवाद हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसून त्याला सामाजिक-आर्थिक पदर असल्याचे आंबेडकर म्हणाले.

Web Title: Modi, Rahul not to be PM, Deve Gowda is right candidate by prakash ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.