Join us  

मुंबई सेंट्रल स्थानकात अत्याधुनिक विश्रामगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 1:25 AM

निविदा प्रक्रिया सुरू : एक्स्प्रेससह लोकल प्रवाशांची होणार आरामाची सोय

मुंबई : रेल्वे प्रवाशांना काही तासांच्या विश्रांतीसाठी आरामशीर आणि ऐसपैस जागेची मागणी असते. या मागणीची पूर्तता करण्यासाठी मुंबई सेंट्रलवर अत्याधुनिक विश्रामगृहाची (एक्झिक्युटिव्ह लाउंज) उभारणी लवकरच करण्यात येणार आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) यांच्या वतीने पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रलवर अत्याधुनिक विश्रामगृह उभारले जाणार आहे. एक्स्प्रेस किंवा लोकलच्या प्रवाशांसाठी या विश्रामगृहाची सोय होणार आहे. या विश्रामगृहात प्रवाशांना किमान दोन तासांची विश्रांती करता येणार आहे. कमी खर्चात आणि कमी जागेत आधुनिक डिझाइनच्या या विश्रांतीगृहात प्रवाशांना तात्पुरती राहण्याची उत्तम सोय होणार आहे.

एकूण १ हजार ४०० चौरस फुटांच्या जागेवर विश्रामगृहाची उभारणी केली जाणार आहे. यात एकूण ४० जणांना एका वेळी विश्रांती करता येणार आहे. या विश्रामगृहामध्ये वातानुकूलित वातावरण असेल. प्रवाशांना बसण्यासाठी आरामदायी खुर्च्या, वायफाय, खाद्यपदार्थ, टीव्ही, स्वच्छतागृह यांची विशेष सोय अत्याधुनिक विश्रामगृहात देण्यात आली आहे. आयआरसीटीसीच्या वतीने देशात नवी दिल्ली, जयपूर, विजयवाडा, आग्रा, विशाखापट्टणम आणि अहमदाबाद या ठिकाणी अत्याधुनिक विश्रामगृहे आहेत. यासह भोपाळ, बडोदा येथे अत्याधुनिक विश्रामगृह उभे करण्यात येणार आहे.सूचनेनुसार केले जाणार काम!मुंबई सेंट्रल येथे अत्याधुनिक विश्रामगृहतयार करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. रेल्वे बोर्डाकडून आयआरसीटीसीलाज्याप्रमाणे सूचना येतील त्याप्रमाणे अत्याधुनिक विश्रामगृहाचे काम केले जाणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसी पश्चिम विभागाचे समूह महाव्यवस्थापक राहुल हिमालियन यांनी दिली.