Join us  

मोडकसागर भरला, दोन दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 6:35 AM

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मोडकसागर तलावही रविवारी दुपारी ३.०५ वाजता भरून वाहू लागला आहे.

मुंबई/वासिंद : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मोडकसागर तलावही रविवारी दुपारी ३.०५ वाजता भरून वाहू लागला आहे. तत्पूर्वी ९ जुलै रोजी तुळशी तलाव सकाळी साडेसात वाजता भरून वाहू लागला होता. जुलै महिन्याच्या पूर्वाधातच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परिणामी, तुळशी तलावा पाठोपाठ आता मोडक सागर तलावही भरून वाहू लागला आहे.गतवर्षीच्या तुलनेत हा जलसाठा कमी आहे. मात्र, असे असले, तरी पावसाचा जोर कायम असल्याने ही तूट भरून निघेल, अशी आशा महापालिकेला आहे. मुसळधार पावसामुळे तलावांमध्ये दररोज सरासरी ३० ते ४० हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा होत आहे. परिणामी, तलाव आता निम्मे भरत असून, पावसाळ्याचे आणखी अडीच महिने शिल्लक असल्याने तलाव काठोकाठ भरतील, असा विश्वास पालिकेला आहे. दरम्यान, मुंबईला दररोज ३ हजार ७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा होतो. मोडकसागर ‘फुल्ल’ झाल्याने धरणाच्या आठ दरवाजांपैकी दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. १६३.१८ मीटर ही धरण भरण्यासाठी असलेली पाण्याची शेवटची पातळी रविवारी ओलांडल्याने धरणाचे चार आणि पाच नंबरचे दरवाजे उघडण्यात आल्याचे शहापूरचे तहसीलदार आर.ए. बाविस्कर यांनी सांगितले. धरणाच्या आजूबाजूला वसलेल्या ४५ गावपाड्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.