Join us

एमकेसीएल व विद्यापीठात जुंपली

By admin | Updated: October 8, 2015 03:22 IST

सलग दोन दिवस गोंधळाच्या वातावरणानंतर मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या परीक्षा बुधवारी शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्या. परीक्षांचा गोंधळ निस्तरला असला,

मुंबई : सलग दोन दिवस गोंधळाच्या वातावरणानंतर मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या परीक्षा बुधवारी शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्या. परीक्षांचा गोंधळ निस्तरला असला, तरी गोंधळाची जबाबदारी घेण्यावरून विद्यापीठ आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (एमकेसीएल) जुंपली आहे.एमकेसीएलवर टीकेची झोड उठली असताना एमकेसीएलने मात्र या गोंधळाचे खापर मुंबई विद्यापीठावर फोडल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी मुंबई विद्यापीठाने मागितलेल्या स्पष्टीकरणावर सादर केलेल्या अहवालात विद्यापीठाने दिलेल्या माहितीतच त्रुटी असल्याचा आरोप एमकेसीएलने केल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई विद्यापीठाने परीक्षेच्या आदल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पीआरएन क्रमांक उपलब्ध करून दिल्याने हॉलतिकिटांचा घोळ झाल्याचा आरोप एमकेसीएलने केल्याचेही सूत्रांकडून कळले. एमकेसीएलने मुंबई विद्यापीठाला अहवाल सादर केल्याची कबुली परीक्षा नियंत्रकांनी दिली. मात्र एमकेसीएलने केलेले आरोप चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. एमकेसीएलने दिलेल्या स्पष्टीकरणावर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक आणि कुलसचिवांनी एक अहवाल कुलगुरूंकडे सादर केला आहे. त्यामुळे कुलगुरू या प्रकरणी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युवा सेना शिष्टमंडळ कुलगुरूंच्या भेटीलादोन दिवस झालेल्या गोंधळामुळे मंगळवारी मनविसेने कुलगुरूंची भेट घेत या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर बुधवारी युवा सेनेच्या शिष्टमंडळानेही कुलगुरू संजय देशमुख यांची भेट घेतली. त्यात एमकेसीएलबाबत सरकारशी चर्चा केल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. शिवाय परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाला एमकेसीएलच्या पार्श्वभूमीवर एखादी प्रणाली विकसित करता येईल का? यावर विचार सुरू केल्याचेही कुलगुरूंनी युवा सेनेच्या शिष्टमंडळाला सांगितले.