Join us

आता बारा महिने होणार मिठी नदीची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:13 IST

मुंबई : वाढत्या कचऱ्याच्या चक्रात अडकलेल्या मिठी नदीला मोकळा श्वास घेता येणार आहे. कारण शासन तसेच महापालिका प्रयत्नानंतर मिठी ...

मुंबई : वाढत्या कचऱ्याच्या चक्रात अडकलेल्या मिठी नदीला मोकळा श्वास घेता येणार आहे. कारण शासन तसेच महापालिका प्रयत्नानंतर मिठी नदीची स्वच्छता करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय समूहाने पसंती दर्शविली होती. याच पार्श्वभूमीवर फिनलंड येथील एक उद्योगसमूह सहा लाख युरोचा निधी मिठीच्या स्वच्छतेसाठी देणार आहे. हुतामाकी असे या समूहाचे नाव असून, ते सलग बारा महिने मिठी नदीची स्वच्छता करणार आहे.

हुतामाकीच्या सहकार्याने एक नमुना कचरा संकलक बनवण्यात आला. आणि त्याची फिनलँडमध्ये चाचणी घेण्यात आली. त्यानंतर तो मुंबईत आणला जाऊन त्याची एकसलग बांधणी करण्यात आली. आता याद्वारे पुढील बाराही महिने मिठी नदीतील कचरा गोळा केला जाणारा आहे. मिठी नदीला स्वच्छ करण्यामध्ये आम्हाला मदत करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये प्रचंड उत्साह वाटत आहे. या प्रकल्पामध्ये प्लॅस्टिक कचरा संकलित करण्याच्या व त्याचबरोबर स्थानिक समाजांना ज्ञान व उपजीविकेचे साधन प्राप्त करण्यासाठी सक्षम बनवले जात आहे, अशी माहिती हुतामाकीचे पॅकेजिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक असलेले सुदीप माळी यांनी दिली.

दरम्यान, नदीतून कचरा उचलण्याच्या पहिल्या प्रयत्नाला चालना देण्यासाठीचा शोध फिनलँडमधील क्लीनटेक या उपक्रमाने लावला असून, समुद्रातील टाकाऊ कचऱ्याची समस्या जी जगातील सर्वाधिक मोठी समस्या आहे. त्यावर उपाय करणाऱ्या रिव्हर रिसायकलचा संकलक महत्त्वाचा घटक आहे.