मुंबई : पुणे येथील कोथरुड परिसरातील एम.आय.टी. कॉलेजच्या पॉलिमर इंजिनीअरिंगच्या एका विद्यार्थ्याला रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजातून कायमस्वरूपी काढून टाका आणि या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या एम.आय.टी. कॉलेजवरही कारवाई करा, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी मंगळवारी दिले.अनंत गाडगीळ, शरद रणपिसे आदी सदस्यांनी याबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. यावरील चर्चेला उत्तर देताना गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले की, याबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले असून, दोन दिवसांत याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यावर सात दिवसांत संबंधित रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र मंत्र्यांच्या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या कोथरुड पोलीस ठाण्याने अद्याप आरोपपत्र दाखल केलेले नाही. तसेच कॉलेजात रॅगिंगचा प्रकार घडला तेव्हा असे प्रकार रोखण्याकरिता समिती स्थापन केलेली नव्हती या बाबी सदस्यांनी निदर्शनास आणल्यावर सभापतींनी वरील आदेश दिले. रॅगिंगच्या प्रकाराचे मोबाइलवर चित्रीकरण असेल तर अन्य पुराव्यांची गरज काय, असा सवाल निंबाळकरांनी केला. तत्पूर्वी डॉ. पाटील म्हणाले की, जुलै २०१४मध्ये या विद्यार्थ्याने सर्वप्रथम रॅगिंग केले जात असल्याची तोंडी तक्रार केली. दोन ते तीन महिने त्याला सतत त्रास दिला जात होता. मात्र त्यानंतर रॅगिंगमुळे इस्पितळात भरती व्हावे लागल्यानंतर या विद्यार्थ्याने पोलिसात तक्रार केली. यानंतर रॅगिंग करणाऱ्या तीन मुलांना एक महिन्याकरिता कॉलेजातून काढून टाकले. (विशेष प्रतिनिधी)पाटील यांच्या या उत्तरानंतर डॉ. नीलम गोऱ्हे, शरद रणपिसे व जयंतराव जाधव या सदस्यांनी महाराष्ट्र सरकारने १९९९ साली केलेल्या रॅगिंग विरोधी कायद्यातील तरतुदीनुसार ७ दिवसांत संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई व्हायला हवी व रॅगिंगच्या तक्रारींची दखल घेण्याकरिता समिती नसेल तर संस्थेवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी केली.
एम.आय.टी. कॉलेजवर कारवाईचे निर्देश
By admin | Updated: March 25, 2015 01:52 IST