Join us  

मुंबईतील गरीब व गरजू रुग्णांच्या वैद्यकीय मदतीसाठी “महापौर निधी” पुन्हा सुरु करा - मंगलप्रभात लोढा

By मनोहर कुंभेजकर | Published: March 07, 2024 5:53 PM

सामान्य नागरिकांना आर्थिक चणचण असल्यामुळे महागड्या रुग्णालयात विविध दुर्धर आजारांवर महागडे उपचार घेणे परवडत नाही.

मुंबई-मुंबईतील गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय मदतीसाठी “महापौर निधी” पुन्हा सुरु करा अशी मागणी मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. 

सामान्य नागरिकांना आर्थिक चणचण असल्यामुळे महागड्या रुग्णालयात विविध दुर्धर आजारांवर महागडे उपचार घेणे परवडत नाही. पालिकेच्या महापौर निधीतून गेल्या अनेक वर्षांपासून गरीब रुग्णांना आर्थिक मदत दिली जात होती. मात्र दि. ८ मार्च २०२२ रोजी पालिका बरखास्त झाल्यानंतर ही मदत देणे बंद झाले असून या गोष्टीला २ वर्ष पूर्ण होत आहेत. महापौर पद रिक्त असल्यामुळे महापौर निधीतून लाभ मिळविण्यासाठी आलेले अर्ज प्रलंबित राहतात व  रुग्णांना  महापौर निधीचा लाभ मिळू शकत नाही. २ वर्षात पालिका चिटणीस विभागाकडे जवळपास ६५० अर्ज आलेले आहेत. पण यापैकी कुणालाही आर्थिक मदत मिळू शकली नाही. या संदर्भात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हि मागणी केली आहे. 

मुंबई महानगर पालिकेत गरीब रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत देण्यासाठी १९५६ पासून महापौर निधी देण्याची परंपरा आहे. या निधीतून पूर्वी ५ हजार रुपये कर्करोग, किडनी प्रत्यारोपण, हार्ट आणि कॅन्सर याच मोठ्या रोगाकरीता आर्थिक मदत म्हणून दिली जात होती. मात्र ही मदत तुटपुंजी होती म्हणून ऑगस्ट २०१९ पासून कर्करोग, किडनी प्रत्यारोप,हार्ट, आणि कॅन्सर च्या रुग्णांना एका वर्षात प्रत्येकी २५ हजार रुपये व किडनी रुग्णांना डायलिसिस साठी १५ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येते. महापौर निधीसाठी  एक मोठी रक्कम जमा होऊन ती बँकेत ठेवण्यात आली आहे. त्या पैशाच्या व्याजातून मिळालेली रक्कम रुग्णांना मदत म्हणून दिली जाते.  ती रक्कम आजही रुग्णांना देता येऊ शकते पण निर्णय घेण्यासाठी महापौर नसल्यामुळे निधी कुणालाच दिला जात नाही. त्यामुळे याबाबत महापालिका आयुक्तांनी तातडीने निर्णय घेऊन,  गरीब व  गरजू रुग्णांच्या वैद्यकीय मदतीसाठी "महापौर निधी" पुन्हा सुरु करावा अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :मंगलप्रभात लोढा