आविष्कार देसाई , अलिबागउरण तालुक्यातील दगड खाणीत दरड कोसळून एकाला प्राण गमवावे लागल्याने जिल्ह्यातील दगड खाणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारच्या नवीन धोरणानुसार खाणपट्टीधारकांना आता खाणकाम आराखडा देणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे धोकादायक खाणींना चांगलाच चाप बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अस्तित्वात असणाऱ्या दगड खाणींची सुरक्षितता जिल्हा खनिकर्म विभागाने तपासण्याची मागणीही जोर धरीत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये ५३ गौण खनिज उत्खननाचे परवाने विविध कालावधीसाठी जिल्हा खनिकर्म विभागाने दिले आहेत. जुन्या आणि नवीन परवाना घेतलेल्या खाणधारकांना आता सरकारच्या २०१३ च्या निर्णयानुसार खानकाम आराखडा देणे बंधनकारक झाले आहे. खाणधारकांना ३० आॅक्टोबर २०१५ पर्यंत आपापले खाणकाम आराखडे देण्याची मुदत देण्यात आली आहे. या आराखड्यामध्ये सुरक्षितपणे कसे उत्खनन केले जाणार आहे, सुरक्षिततेचे कोणते उपाय आहेत त्याचप्रमाणे खाण बंद केल्यानंतर तेथे निर्माण झालेला खड्डा कसा भरला जाणार आहे. उत्खनन केलेल्या खाणीचे फिनिंशिग व्यवस्थित करणे अत्यावश्यक आहे. खड्ड्याच्या ठिकाणी फिश टँक बांधणे, तेथे साठणाऱ्या पाण्यासाठी वॉटर स्टोरेज निर्माण करणे, उत्खनन केलेल्या जागेला कुंपण घालणे यासह अन्य महत्त्वाच्या बाबींची माहिती खानकाम आराखड्यात द्यावी लागणार आहे.त्यामुळे आता खाणपट्टा घेतलेल्यांना खाण अशीच उघड्यावर टाकून जबाबदारी झटकता येणार नाही. सरकारच्या नियमानुसार उत्खनन केलेल्या खाणीच्या ठिकाणी खड्डा झाला तर त्यावर भराव करुन तो बुजवून टाकणे आवश्यक आहे. मात्र काही खाणधारक काम संपले की धोकादायक खाण तशीच ठेवतात. त्यामुळे पावसाळ््यामध्ये तेथे दरडी पडण्याचे प्रमाण वाढते. उरण येथील मोरा-बेलदारवाडा येथे दगड खाणी खोदून ठेवलेल्या अवस्थेत आहेत. रविवारी त्याच खाणीत पडणाऱ्या धबधब्याखाली काही मुले उतरली होती. त्याचवेळी वरून दरड कोसळल्याने नीलेश एकलदेवी (१३) या मुलाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र साहिल वाल्मीकी हा जखमी झाला.आता दगडखाणधारकांना आपापल्या ताब्यात असणाऱ्या खाणींची सुरक्षितता राखणे आवश्यक आहेच, शिवाय खाणीचा ताबा सोडल्यानंतरही ती सुरक्षित स्थितीत प्रशासनाच्या स्वाधीन करणे बंधनकारक झाले आहे. यामुळे सुरक्षिततेबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यास मदत होणार आहे.सरकारच्या २०१३ च्या निर्णयानुसार खाणधारकांना खानकाम आराखडे द्यावे लागणार आहेत. त्यांनी एक लाख रुपये सुरक्षा ठेव आणि एक लाख रुपये बँक ठेव ठेवणे आवश्यक आहे. अटी शर्तींचा भंग केल्यास ती रक्कम जप्त होते. जिल्ह्यातील दगड खाणीची सुरक्षिततेची तपासणी करण्यात येईल.- रोशन मेश्राम, जिल्हा खनिकर्म अधिकारी
खाणकाम आराखडा बंधनकारक
By admin | Updated: June 29, 2015 22:33 IST