सुरेश लोखंडे ल्ल ठाणेराज्यभरात ११ हजार मिनी अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. त्यातील लाखो बालकांवर शैक्षणिक संस्कार करण्याचे काम सुमारे ११ हजार सेविका करीत आहेत. त्यांना ७५० रुपये वाढीव मानधन लागू करण्यात आल्याने आता दरमहा ३ हजार २५० रुपये मानधनाचा लाभ या सेविकांना होणार आहे.एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत राज्यात या मिनी अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. शासनाच्या महिला व बालविकास विभागाने, केंद्र शासनाच्या केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने जुलै २०१३पासून या सेविकांना वाढीव मानधन घोषित केले होते़ यानुसार, राज्य शासनाने एप्रिल २०१४पासून मानधनवाढ घोषित केली. त्यानुसार, केंद्र शासनाच्या ९० टक्क्यांसह राज्य शासनाचा १० टक्के हिस्सा धरून या सेविकांना आता दरमहा ७५० रुपये वाढीव मानधनासह ३ हजार २५० रुपये मानधन मिळणार आहे. याबाबतचा आदेश शासनाने गेल्याच आठवड्यात जारी केला आहे़राज्यातील या मिनी अंगणवाडी सेविकांना दोन जणांचे काम एकटीला करावे लागते. यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दोन्हींच्या तुलनेत मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दुप्पट वाढ होणे अपेक्षित असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी सांगितले. सुमारे १० वर्षांच्या लोकसंख्येच्या आधारावर या मिनी अंगणवाडी व अंगणवाडी केंदे्र सुरू झाली आहेत. १ हजार लोकसंख्येच्या परिसरातील बालकांसाठी अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आले. त्यावर राज्यभरात सुमारे ८८ हजार सेविका तर सुमारे ८८ हजार मदतनीस कार्यरत आहेत. याप्रमाणेच ५०० लोकसंख्येच्या निकषावर मिनी अंगणवाड्या सुमारे १२ वर्षांपूर्वी सुरू केल्या आहेत. सध्या या निकषाच्या दुप्पट-तिप्पट लोकसंख्या संबंधित परिसराची असतानाही तेथे मिनी अंगणवाडीच असून, त्यावर एकच सेविका कार्यरत असतानाही तिचे मानधन आतापर्यंत केवळ ३२५० रुपये झाले आहे. यामुळे अन्य सेविका व मदतनिसांच्या तुलनेत दुप्पट काम करणाऱ्या या मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधनदेखील दुपटीने वाढायला हवे होते, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.