शोभना कांबळे- रत्नागिरी योग्य प्रकारे काम केले तर मतिमंदत्व असलेल्या मुलांच्या मूलभूत प्राथमिक क्षमतांचा विकास पूर्णत्वाला जाऊ शकतो, याचा प्रत्यय रत्नागिरीतील तरूण अनिकेत चिपळूणकर याच्याकडे पाहिल्यानंतर येतो. आविष्कार संस्थेत शिक्षण घेतलेल्या अनिकेतच्या हातातील ‘वारली’ कलेचा आविष्कार पाहून सामान्यांचीही मती अगदी गुंग होऊन जाते.अनिकेतचे पूर्वीचे शिक्षण महाडच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. पण, तिथेही त्याला गती नसल्याने त्याच्या वडिलांनी रत्नागिरीत आल्यावर त्याला येथील आविष्कार शाळेत दाखल केले. तो तेव्हा अकरा वर्षांचा होता. या शाळेत आल्यानंतर येथील मुख्याध्यापिका, त्याच्या मार्गदर्शिका शमीन शेरे आणि इतर शिक्षकवर्ग यांच्या लक्षात आले की, अभ्यासापेक्षा तो चित्रकला, रंगकला यात अधिक रमतोय. विशेषत: वारली शैलीतील ‘फॉर्म’ त्याला चांगला जमतोय. त्यामुळे त्यांनी त्याला वारली, मधुबनी शैलीतील चित्रकला शिकवण्यास सुरूवात केली. त्याने रंगवलेल्या मधुबनी मोराच्या चित्राच्या डिझाईनचे बुकमार्क तयार केले. त्याला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्याला वारली चित्रकलेची सखोल माहिती देण्यात आली वारली जीवन, त्यामधील महत्त्वाचे प्रसंग, यासंबंधीचे सर्व साहित्य गोळा करून त्याला पाहायला दिले. एकेका प्रसंगाचा अभ्यास त्याच्याकडून करून घेतला गेला. कापड, कागद, माती, लाकूड, प्लास्टिक अशा वेगवेगळ्या माध्यमांवर वारली चित्र काढण्याचा त्याला सराव दिला. ३ डिसेंबर २०११ ला जागतिक मानसिक अपंग दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील गीता भवन येथे ‘कलाजत्रा’ प्रदर्शन भरवण्यात आले होते. शाळेतील मुलांच्या विविध वस्तुंसोबतच अनिकेतने वारली चित्रकला काढलेल्या विविध बॅगा, पाऊच यांचा समावेश होता. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर रत्नागिरीमध्ये वनवासी कल्याण आश्रम संस्थेने आयोजित केलेल्या हरेश्वर वनगा यांच्या कार्यशाळेत अनिकेतने बांबूपासून वारली चित्रकलेचा ब्रश कसा तयार करायचा आणि चित्रात अभिव्यक्ती कशी आणायची याचे प्रशिक्षण घेतले. रत्नागिरीतील रंगधानी आर्ट गॅलरीत त्याच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. तशातच अनिकेतला संधी मिळाली ती त्याच्या वडिलांमुळे. त्याचे वडील कोकण रेल्वेत सेवेत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेच्या वर्धापन दिनी रत्नागिरीतील रेल्वे स्थानकावरही एका दालनात या गुणी कलाकाराच्या चित्राचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी अनेक महिने त्याने घेतलेले श्रम अवर्णनीय असेच होते. याठिकाणी चित्र काढण्यापूर्वी त्याने काढलेली चित्र आडव्या प्रकारची होती. मात्र, या ठिकाणी तर उभ्या भिंतीवर काढायची होती. काही दिवस त्याच्याबरोबर त्याचा एस्कॉर्ट होता. पण, घरच्या अडचणीमुळे शेवटच्या दोन महिन्यात तोही नव्हता. त्यामुळे त्याचे वडील सकाळी त्याला रेल्वे फलाटावर सोडून सायंकाळी ते स्वत: किंवा त्याचा भाऊ त्याला न्यायला येत असत. पण, दिवसभर एकट्याने काम करून त्याने आपली कला तेथे साकारली आहे.अनिकेतमधील ही कला दिवसेंदिवस बहरत असली तरी पुनवर्सनाच्या दृष्टीने येथील कार्यशाळेत त्याला आवश्यक असलेल्या या कलेचे पुढील शिक्षण उपलब्ध नसल्याने तो आता संतुलन सर्वांगीण मानसिक आरोग्य केंद्र येथे प्रशिक्षण घेतानाच आपले अर्थार्जनही करतो. त्याच्या या अप्रतिम हस्तकलेने त्याला अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आज अनेक घरांचे हॉल, ग्रीटिंग कार्ड्स, बुकमार्क, बॅगा, कपडे, कोस्टर्स आदी वस्तुंवर, एवढेच नव्हे कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकाच्या भिंतीवरही त्याची चित्रे विराजमान झाली आहेत.अनिकेत याने पुण्यात झालेल्या अॅबिलिंपिक्स या स्पेशल आॅलिंपिक स्पर्धेत मतिमंद गटात ‘सिल्क हँड पेंटिंग’मध्ये भाग घेतला. पण, या गटात त्याला स्पर्धक नसल्याने त्याने कर्णबधिर मुलांच्या गटात भाग घेऊन तृतीय क्रमांक मिळवला. अहमदाबाद येथे नोव्हेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही त्याला स्पर्धक नव्हता. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याला भाग घेण्याची संधी मिळणार आहे. पण, इथेही स्पर्धक मिळाला नाही, तर मतिमंद मुलांमध्ये तो एकमेव ठरणार आहे.मधुबनी आणि वारली चित्रशैलीमध्ये काम करणाऱ्या अनिकेत या विद्यार्थ्याबरोबर चांगले व सकस काम करता आले, हा अनुभव म्हणजे आयुष्यभराची बेगमी आहे.- शमीन शेरे, मुख्याध्यापिका आविष्कार शाळा, रत्नागिरी
मतिमंद तरूणाने साकारली मती गुंग करणारी चित्रकला
By admin | Updated: August 7, 2014 00:17 IST