Join us  

गुन्हे शाखेचे मिलिंद काठे सीआययूचे प्रभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:07 AM

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी धमकीप्रकरणात बदली होत निलंबित झालेल्या सचिन वाझे यांच्या रिक्त झालेल्या जागी गुन्हे शाखेच्या कक्ष ...

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी धमकीप्रकरणात बदली होत निलंबित झालेल्या सचिन वाझे यांच्या रिक्त झालेल्या जागी गुन्हे शाखेच्या कक्ष २ चे वरिष्ठ मिलिंद मधुकर काठे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुकेश अंबानी धमकी प्रकरणात त्यांच्याकडेही एनआयएने चौकशी केली होती. त्यामुळे गुन्हे शाखेतील ६५ जणांच्या बदलीनंतर मंगळवाऱी गुन्हे शाखेला २४ नवीन अधिकारी मिळाले आहेत.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटके आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ कारप्रकरणी दाखल गुन्ह्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे (सीआययू) तत्कालीन प्रमुख निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. अशात मनसुख हिरेन हत्या प्रकरणातही तेच प्रमुख आरोपी असल्याचा संशय एनआयएला आहे. नवीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी वाझे प्रकरणानंतर गुन्हे शाखेत वर्षानुवर्षे ठाण मांडून असलेल्या अधिकाऱ्यांची गेल्या आठवड्यात तडकाफडकी बदली केली. यात एकाच वेळी गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती.

गुन्हे शाखेचे प्रमुख सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी मंगळवारी याबाबत आदेश काढून गुन्हे शाखेत नव्याने हजर झालेल्या २४ पोलीस निरीक्षकांना नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. तसेच वाझे यांच्यानंतर रिक्त झालेल्या जागी कोण येणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. अशात गुन्हे शाखेच्या कक्ष दोनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक मिलिंद मधुकर काठे यांच्याकडे सीआययूची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच कक्ष तीनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्याकडे खंडणीविरोधी पथकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काठे यांच्याकड़ेही एनआयएने चौकशी करीत त्यांचा जबाब नोंदवला आहे. मुकेश अंबानी धमकी प्रकरणात सुरुवातीला करण्यात आलेल्या तपास पथकामध्ये त्यांचाही समावेश होता. त्यामुळे तपास अधिकारी म्हणून त्यांचाही जबाब नोंदविण्यात आला आहे.