Join us  

‘मैलाचे दगड’ दृष्टिक्षेपात! वास्तू सल्लागारांची घेणार मदत : शोध घेऊन मुंबई महापालिका करणार जतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 3:55 AM

ब्रिटिश काळात मुंबईत काही ठिकाणी मैलाचे दगड लावण्यात आले होते. कित्येक वर्षांनंतर यातील काही मैलाचे दगड नामशेष झाले असून, काही शिल्लक आहेत.

मुंबई : ब्रिटिश काळात मुंबईत काही ठिकाणी मैलाचे दगड लावण्यात आले होते. कित्येक वर्षांनंतर यातील काही मैलाचे दगड नामशेष झाले असून, काही शिल्लक आहेत. मैलाच्या दगडांनी मुंबईचा ऐतिहासिक वारसा जपला असून, नामशेष होत चाललेले मैलाचे दगड शोधून, मुंबई महापालिका त्यांचे जतन करणार आहे. विशेष म्हणजे, महापालिका या कामी पुरातन वास्तू सल्लागाराची मदत घेणार आहे, तसा निर्णयच मुंबई महापालिकेने घेतला आहे.सद्य:स्थितीचा विचार करता, काळबादेवी, ताडदेव, लोअर परेल, दादर, भायखळा आणि माझगाव येथे ब्रिटिश राजवटीत मैला-मैलावर रोवण्यात आलेले मैलाचे दगड अस्तित्वात आहेत. संबंधित मैलाच्या दगडांवर मुंबईच्या क्षेत्रफळाबाबतची आणि इतर माहिती दर्शविण्यात आली आहे, परंतु गेल्या काही वर्षांपासून मुंबईत होत असलेल्या विकासासह इतर अनेक कामांमुळे मैलाचे दगड नामशेष होत आहेत, तर काही गाडले गेले आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मुंबईचा हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होत असून, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी, मुंबईचा हा ऐतिहासिक ठेवा जपला जावा, मैलाच्या दगडाचे जतन व्हावे, म्हणून प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी महापालिकेकडे केली होती. लोकप्रतिनिधींनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केल्यानंतर, या ठरावास मंजुरी मिळाली आहे.ही मंजुरी अभिप्रायासाठी महापालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आल्यानंतर, याबाबतचा प्रस्ताव विधि समितीपुढे आला आणि आयुक्तांनी यावरही अभिप्राय दिला. या कामी पुरातन वास्तू सल्लागाराची मदत घेण्यात येईल, असे आयुक्तांनी आपल्या अभिप्रायात नमूद केले.काळबादेवी, इब्राहिम रहिमतुल्ला रोड, डॉ. मस्करेन्हास रोड माझगाव, आॅगस्ट क्रांती मार्ग, भाटिया रुग्णालयासमोरील जावजी दादाजी मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग चिंचपोकळी पूल, ना. म. जोशी मार्ग चिंचपोकळी पूल, डॉ. एस.एस. राव मार्ग, साई ट्रेडर्ससमोर, ना.म. जोशी मार्ग ईएसआयएस भवनसमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग चित्रा सिनेमासमोर, एस. भोले. मार्ग अँथोनी डिसिल्व्हा शाळेसमोर, सायन, कर्नाटका बँकेसमोर, लेडी जमशेटजी रोड, वीर नरिमन रोड, पीडब्ल्यूडी इमारतीच्या बाहेरील प्रवेशद्वार, वीर नरिमन रोड मार्कर स्टोन या ठिकाणी मैलाचे दगड अस्तित्वात होते.ग्रेड एकचा दर्जामैलाच्या दगडांना मुंबई जतन वारसा समितीने ग्रेड एकचा दर्जा दिला आहे. मैलाच्या दगडांचा ऐतिहासिक दर्जा टिकून राहण्यासाठी त्यांचे जतन करणे आवश्यक आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या मैलाच्या दगडांचे जतन, संवर्धन व सुशोभीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. हेरिटेज सूचीमधील १५ मैलांच्या दगडांपैकी ५ ठिकाणचे मैलाचे दगड कालौघात नष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे.१० मैलांचे दगड रस्ते व पदपथांची उंची वाढल्यामुळे जमिनीत गाडले गेले. या १० दगडांपैकी एफ/दक्षिण विभागाने डॉ. एस.एस. राव मार्गावरील मैलाचा दगड जपला आहे.आता जमिनीखाली गाडलेले व रासायनिक द्रव्ये व प्रदूषित हवेमुळे खराब झालेले हे दगड बाहेर काढून, ते स्वच्छ करून, त्याभोवतीचा परिसर कोबाल्ट स्टोन बसवून सुशोभित करण्यात येईल.अस्तित्वात नसलेल्या दगडाची बेसॉल्ट दगडामध्ये अथवा अन्य टिकाऊ वस्तूमध्ये प्रतिकृती निर्माण करण्यात येईल. या कामासाठी पुरातन वास्तू सल्लागाराची मदत घेण्यात येणार आहे, असे आयुक्तांनीस्पष्ट केले.

टॅग्स :मुंबई