Join us  

ठाणे जिल्ह्यात म्हात्रे,कलानी झाल्या आमदार

By admin | Published: October 21, 2014 1:54 AM

१५ आॅगस्ट रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्याने ठाणे आणि पालघर असे दोन जिल्हे तयार झाले आहेत.

पंकज रोडेकर, ठाणे१५ आॅगस्ट रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्याने ठाणे आणि पालघर असे दोन जिल्हे तयार झाले आहेत. या दोन्ही जिल्ह्यांत प्रथमच विधानसभेची निवडणूक झाली असून ठाणे जिल्ह्यातून दोन महिला उमेदवारांना आमदार होण्याचा मान मिळाला आहे. दोन्ही महिला उमेदवारांनी दिग्गजांना पराभूत केले आहे. यात बेलापूरच्या मंदा म्हात्रे तर उल्हासनगरच्या ज्योती कलानींचा समावेश आहे़ पालघरमधून एकही महिला उमेदवार निवडून आलेली नाही. दोन्ही जिल्ह्यांत एकूण २४ मतदारसंघ आहेत. त्यामध्ये १४ महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी या विजयी होऊन पहिल्यांदा आमदार झाल्या आहेत. या मतदारसंघात सर्वाधिक २२ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये भाजपाचे आमदार कुमार आयलानींचे त्यांना खरे आव्हान असतानाही त्या १ हजार ८६३ मतांनी विजयी ठरल्या आहेत. नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातून भाजपाच्या मंदा म्हात्रे यांनी ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा पराभव केला आहे़ त्यांनी गणेश नाईकांचा १ हजार ४९१ मतांनी पराभव केला असून या मतदारसंघात अन्य एका मंदा म्हात्रे नावाच्याच अपक्ष उमेदवाराला अवघी १९५ मते पडली आहेत.ओवळा-माजिवड्यातून काँग्रेसकडून तिकीट मिळालेल्या भार्इंदरच्या प्रभात पाटील यांना १३ हजार ५२९ मतांवर समाधान मानावे लागले आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात सर्वाधिक तीन महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उभ्या होत्या. त्यामध्ये काँग्रेसच्या शारदा पाटील यांना ९ हजार २१३, बहुजन समाज पार्टीच्या भारती पगारे यांना २ हजार ५११ तर रिपब्लिकन बहुजन सेनेच्या मनीषा इनरकर यांना ३७३ मते मिळाली आहेत. कोपरी-पाचपाखाडीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार सेजल कदम यांना ८ हजार ५७८ मते पडली आहेत. तसेच तेथून रिपब्लिकन बहुजन सेनेच्या आशा शरनांगत यांना ३०५ मते मिळाली आहेत. ऐरोलीतून अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या राहिलेल्या सुनीता तूपसौंदर्य यांना ४१७ मते मिळाली आहेत. कल्याण पश्चिममधून प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीच्या अनिता कोळेकर यांना ३१६ तर अपक्ष उमेदवार मारिया फर्नांडिस यांना १६३ मतांवर समाधान मानावे लागले आहे. भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, अंबरनाथ, कल्याण पूर्व, डोंबिवली, मीरा-भार्इंदर, ठाणे शहर, शहापूर या मतदारसंघांतून एकाही महिलेने उमेदवारी अर्ज भरला नाही.