Join us  

संपाकडे व्यापार्‍यांची पाठ

By admin | Published: May 29, 2014 2:00 AM

माथाडी कामगारांच्या आंदोलनामध्ये एपीएमसीमधील पाचही मार्केट बंद होती. परंतु हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच व्यापारी आंदोलनात सक्रिय सहभागी होते.

नामदेव मोरे, नवी मुंबई  - माथाडी कामगारांच्या आंदोलनामध्ये एपीएमसीमधील पाचही मार्केट बंद होती. परंतु हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच व्यापारी आंदोलनात सक्रिय सहभागी होते. व्यापार्‍यांची अनुपस्थिती हा सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमसी) मागील काही वर्षांपासून व्यापार्‍यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये माथाडी कामगारांनी सक्रिय सहभाग घेतला होता. व्यापारी व माथाडी हे एकमेकांवर अवलंबून आहेत. व्यापार टिकला तर माथाडी जगेल या भावनेने कामगार व त्यांचे नेते व्यापार्‍यांसाठी सरकारशी भांडतात. परंतु आता माथाडी कामगारांवर अस्तित्वासाठी लढाई करण्याची वेळ आली आहे. धान्य व मसाला मार्केटच्या अखत्यारीत येणार्‍या साखर, डाळी, गूळ, मैदा व तेल या वस्तू नियमनातून वगळण्यात आल्या आहेत. याचा थेट परिणाम माथाडी कामगारांच्या रोजगारावर होवू लागला आहे. सर्व वस्तू पुन्हा नियमनाखाली आणाव्या व इतर प्रश्नांसाठी कामगारांनी आज बंदचे आयोजन केले होते. या बंदमध्ये भाजी, फळ व कांदा - बटाटा मार्केटमधील व्यापारी संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे. माथाडी भवनमध्ये सभेला फक्त भाजी मार्केटचे संचालक शंकर पिंगळे उपस्थित होते. इतर चारही मार्केटचे संचालक उपस्थित नव्हते. फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी प्रतिनिधी पाठविला होता तर कांदा - बटाटा मार्केटमधील संचालक अशोक वाळुंज यांनी सांगितले की, आम्ही मंगळवारीच पाठिंब्याचे पत्र दिल्याचे स्पष्ट केले. माथाडींच्या बंदकडे धान्य व मसाला मार्केटचे संचालक फिरकलेच नाहीत. फामचे अध्यक्ष मोहन गुरनानी हे बंदमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी मदत करण्याचे आश्वासनही दिले. परंतु इतर व्यापारी मात्र सभेकडे आलेच नाहीत. यामुळे कामगारांनीही नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही मार्केटमधील व्यापार्‍यांचा नियमनातून वगळलेल्या वस्तू पुन्हा नियमनाखाली आणण्यास छुपा विरोध आहे. माथाडी कामगारांशी प्रेमाचे संबंध दाखविले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र कामगारांची मजुरी जास्त असल्याचे बोलले जाते. यामुळेच व्यापार्‍यांनी कामगारांना वार्‍यावर सोडल्याची चर्चा सुरू झाली आहे. भविष्यात व्यापार्‍यांवर संकट आले तर त्यांच्या पाठीमागे उभे राहायचे का, असा प्रश्न कामगार उपस्थित करत आहेत.