लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोळीवाडा सीमांकनाबाबत चर्चा करण्यासाठी आज राज्याचे पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. कोळीवाड्यातील समस्या व त्यावरील उपाययोजना यावर या वेळी सकारात्मक चर्चा झाली. कोस्टल झोन प्राधिकरण, मुंबई महापालिका, पर्यावरण विभाग आदी संबंधित सर्व विभागांनी यासंदर्भात समन्वयाने काम करावे, अशा सूचना ठाकरे यांनी या वेळी दिल्या. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर येथील यासंदर्भातील आढावा या वेळी घेण्यात आला. लोकमतने याबाबत सातत्याने वृत्त देऊन शासनाचे लक्ष वेधले आहे.
अंतिम सीमांकन होईपर्यंत ग्रे क्षेत्रातील लोकांना हलवू नये, अशी विनंती तेथील नागरिकांनी केली आहे. याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यासंदर्भात तशा सूचना मुंबई महापालिकेला देण्यात येतील, असे आदित्य ठाकरे यांनी या वेळी सांगितले.
मुंबई उपनगरातील ४२ क्षेत्रांचे सर्वेक्षण झाले असून त्यापैकी २१ क्षेत्रांचे सीमांकन निश्चित करण्यात आले आहे. १४ क्षेत्रांचे सीमांकन प्रगतिपथावर आहे. मुंबई शहरातील १९ क्षेत्रांपैकी १२ क्षेत्रांचे सीमांकन झाले असून ७ क्षेत्रे ही एमबीपीटी, रेल्वे, केंद्र शासन इत्यादींच्या मालकीची जमीन असल्याने काही समस्या आहेत, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
सीएमएफआरआयच्या अहवालानुसार मच्छीमारीशी संबंधित विविध कामांच्या क्षेत्रांचा सीमांकनामध्ये समावेश करावयाचा आहे. महसूल विभागाकडून करण्यात आलेले सीमांकन प्रसिद्ध करण्यात आले असून यासंदर्भात प्राप्त झालेल्या सूचना व हरकती महसूल विभागास कळविण्यात येतील, असे मुंबई महापालिकेच्या संबंधित विभागाकडून या वेळी सांगण्यात आले. अशा विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने या वेळी चर्चा झाली. कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनच्या अनुषंगाने मच्छीमार गावांच्या सीमांकनाबाबत या वेळी चर्चा झाली. गावठाणातील समस्यांसंदर्भात चर्चा झाली.
या बैठकीला खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, संबंधित जिल्हाधिकारी आदी वरिष्ठ अधिकारी, कोळीवाड्यांतील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
००००