Join us  

वैद्यकीय परीक्षांचे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 5:12 AM

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने परीक्षेचे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या यावर्षीच्या वैद्यकीयच्या उन्हाळी पदवीपूर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा १६ जुलैपासून घेण्याचे तात्पुरते वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले होते, मात्र विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने परीक्षेचे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.तर पीजीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा तीन ते चार महिने पुढे ढकलण्यात यावी. जर त्या परीक्षा रद्द करून मागील तीन वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित त्यांना गुण देता येत असतील तर ते द्यावेत, असा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून तो केंद्र शासनाला पाठवला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने परीक्षा न घेण्याच्या मुद्यावर प्रतिकूल प्रतिसाद दिल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता सुरक्षेच्या सर्व बाबी विचारात घेऊन या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देता येईल.