डॉ. अभय बंग अन् डॉ. राणी बंग यांचा सन्मान, मानद डॉक्टरेट प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 03:38 AM2019-07-31T03:38:48+5:302019-07-31T03:40:36+5:30

राज्यपाल : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा चौथा विशेष पदवी प्रदान समारंभ; डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग यांना डी. लिट पदवी प्रदान

Medical admission process needs to be facilitated | डॉ. अभय बंग अन् डॉ. राणी बंग यांचा सन्मान, मानद डॉक्टरेट प्रदान

डॉ. अभय बंग अन् डॉ. राणी बंग यांचा सन्मान, मानद डॉक्टरेट प्रदान

Next

मुंबई : हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी चीन, रशिया, युक्रेन आदी देशांमध्ये जातात. आपल्या विद्यापीठांपेक्षा तेथील वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे अधिक सोपे असल्याचे दिसते, हे लक्षात घेऊन आपल्याकडील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियाही कशी सुलभरीत्या होईल, याबाबत विचार होणे गरजेचे आहे. आपल्या विद्यापीठांनी या दिशेने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मंगळवारी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा चौथा विशेष पदवी प्रदान समारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा विद्यापीठाचे प्रति - कुलपती गिरीश महाजन, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव कालिदास चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कुपोषणमुक्ती, आरोग्य आदी विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना विद्यापीठाच्या वतीने डी. लिट ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते त्यांना यावेळी सन्मानचिन्ह देण्यात आले.
राज्यपाल म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात गरीब आणि आदिवासी बांधवांपर्यत आरोग्य सुविधा पोहोचविणे आणि त्यांच्यामध्ये जागृती करण्यासाठी बंग दाम्पत्याने केलेले कार्य फार मोठे आहे. मागील चार दशकांपासून आदिवासी भागात राहून ते काम करीत आहेत. वैद्यकीय पेशा स्वीकारताना घेतलेल्या शपथेचे तंतोतंत पालन करून त्यांनी मानवतेसाठी काम केले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये निर्माण होणारे तणावाचे प्रसंग हे चिंता करायला लावणारे आहेत. डॉक्टरांचा रुग्णांशी होणारा संवाद सुधारून वैद्यकीय पेशा अधिक मानवतावादी होण्यासाठी आपणास प्रयत्न करावे लागतील. डॉक्टर आणि रुग्णांमधील संबंध विश्वासाचे असले पाहिजेत. पीडित लोकांसाठी दयेने काम केल्यास हे संबंध निश्चितच चांगले राहतील. वैद्यकीय पेशाचे शिक्षण देताना याबाबतही शिक्षण देणे गरजेचे आहे, असे राज्यपाल म्हणाले.

बंग दाम्पत्याने मानसिकता बदलाचे काम केले - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, डॉ. बंग दाम्पत्याने जे जे उपक्रम राबविले, त्यात त्यांनी लोकांमधील समज - गैरसमज दूर करून मानसिकता बदलाचे काम केले. मागील दोन वर्षांपासून त्यांनी तंबाखूमुक्त जिल्ह्याचा उपक्रम अनोख्या पद्धतीने राबविला. बाल मृत्युदर, माता मृत्युदर कमी करणे, कुपोषण कमी करणे, आदिवासींपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविणे यासाठी बंग दाम्पत्याने केलेले कार्य मोठे आहे. त्यांनी या क्षेत्रात केलेले काम आणि संशोधन यातून शासनालाही मार्गदर्शन मिळत राहिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करून, त्यांनी आदिवासींमध्ये विश्वास निर्माण केला.

गडचिरोली हे जीवन विद्यापीठ - डॉ. अभय बंग
डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी या बहुमानाबद्दल विद्यापीठाविषयी कृतज्ञ भावना व्यक्त केली. डॉ. अभय बंग म्हणाले, गडचिरोली हे माझे जीवन विद्यापीठ आहे. तेथील आदिवासींची सेवा करताना आरोग्यविषयक जे शिक्षण मला मिळाले, त्यावर आज डी. लिट पदवी देऊन विद्यापीठाने शिक्कामोर्तब केले आहे. यापुढील काळातही सेवाकार्य अधिक जोमाने करण्यास यातून प्रेरणा मिळाली आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक
२०११च्या जनगणनेनुसार देशात ६० वर्षांवरील १०४ दशलक्ष इतके ज्येष्ठ नागरिक आहेत. २०५० पर्यंत देशात ३४० दशलक्ष ज्येष्ठ नागरिक असतील, असा अंदाज आहे. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा ही लोकसंख्या अधिक असेल. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने या बाबीचा विचार करून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याविषयी धोरण ठरविले पाहिजे. पुढील काळात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य समस्यांवर आपणास विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक असून, त्यांच्यासाठी विशेष रुग्णालये आदी बाबींचा विचार करावा लागेल, असेही राज्यपालांनी सांगितले.

Web Title: Medical admission process needs to be facilitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.