Join us  

मध्य रेल्वेमार्गावर लवकरच ‘मेधा’ धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 4:18 AM

मध्य रेल्वेच्या ४५ लाख प्रवाशांचे भारतीय बनावटीच्या ‘मेधा’ लोकल सफरीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. मध्य रेल्वेवर मेधा लोकल चालवण्यासाठी उच्चपदस्थ अधिका-यांनी जोरदार तयारी केली आहे.

मुंबई : मध्य रेल्वेच्या ४५ लाख प्रवाशांचे भारतीय बनावटीच्या ‘मेधा’ लोकल सफरीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. मध्य रेल्वेवर मेधा लोकल चालवण्यासाठी उच्चपदस्थ अधिका-यांनी जोरदार तयारी केली आहे. पश्चिम रेल्वेवर मेधा लोकल देऊन तेथील सिमेन्स लोकल मध्य रेल्वेवर आणण्याचाही प्रस्ताव आहे. मात्र त्यास मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांनी हरकत घेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आधुनिक बनावटीची मेधा मध्य मार्गावरच चालवण्यात येणार आहे.‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत भारतीय बनावटीची मेधा लोकल सध्या कुर्ला कारशेडमध्ये विश्रांती घेत आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर नुकत्याच नवीन लोकल दाखल झाल्या आहेत. भारतीय बनावटीची मेधा पश्चिम रेल्वेला देत तेथील लोकल मध्य मार्गावर आणण्याची तयारी पश्चिम रेल्वे अधिकारी करत आहेत. मात्र त्यावर मध्य रेल्वेच्या उच्च पदस्थ अधिकाºयांनी नाराजी दर्शवली. सिमेन्स आणि बम्बार्डिअरच्या तुलनेत मेधा लोकलचा देखभाल खर्च १० ते ३० टक्के कमी आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर वातानुकूलित लोकल लवकरच धावणार आहे. त्यामुळे मेधा लोकल मध्य मार्गावर चालवण्यात यावी, अशी मागणी उच्चपदस्थ अधिकारी करीत आहेत.प्रवासात उत्तम व्हेंटिलेशन मिळावे, यासाठी मेधा लोकलच्या डब्यात विशेष संरचना करण्यात आली आहे. यामुळे १६०० क्युबिक मीटर प्रति तास या क्षमतेने व्हेंटिलेशन होणार आहे. मेधा लोकलचे दरवाजे मजबूत आणि वजनाने हलके असल्यामुळे स्लाईडिंग करणे प्रवाशांना सोपे होणार आहे. मोटरमनला रिअल टाइम माहिती पुरवणारी यंत्रणा मेधा लोकलमध्ये आहे. आपत्कालीन परिस्थितीत गार्ड आणि प्रवाशांसोबत संपर्क साधण्यासाठी तशी यंत्रणाही बसवण्यात आली आहे.मेधा लोकलची किंमत 43.23 कोटी आहे; तर बम्बार्डिअर लोकलची किंमत ४४.३६ कोटी आहे. यामुळे मेधा लोकल बनावटीसाठी तब्बल १ कोटींची बचत होणार आहे.6030 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता मेधा लोकलमध्ये आहे. यात १ हजार १६८ आसने आणि ४ हजार ८६२ प्रवासी उभे राहण्याची क्षमता आहे.चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीत (आयसीएफ) लोकल बांधणीचे काम वेगाने सुरू आहे. यात मेधा, बम्बार्डिअर लोकलचा समावेश आहे. मध्य मार्गावर मेधा लोकलच धावणार, असे वरिष्ठ अधिकाºयांनी खासगीत बोलताना सांगितले.

टॅग्स :मुंबई उपनगरी रेल्वे