मुंबई : भायखळा येथील डॉ़ भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय विस्ताराचा निर्णय २०११ मध्ये तत्कालीन महापौर व आयुक्तांनी घेतला़ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कला दालनासाठी जागतिक स्तरावर स्पर्धा घेऊन वास्तुविशारद निवडण्याचेही तेव्हाच ठरवले, असा बचाव करीत आयुक्तांनी सत्ताधारी शिवसेनेवरच गेम उलटवला आहे़ त्यामुळे विरोधी पक्षांना या विषयावर बोलू न देण्यासाठी राणी बागेच्या संचालकांच्या पद सातत्याचा प्रस्ताव मागे घेऊन शिवसेनेने वेळ मारून नेली़डॉ़ लाड वस्तुसंग्रहालय ट्रस्टमार्फत कला दालनासाठी राणी बागेची जागा हडप करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे़ प्रशासनाने ट्रस्टच्या विश्वस्तांसोबत हातमिळवणी करून हा घाट घातला असल्याचा हल्लाबोलच विरोधी पक्षांनी केला होता़ मनसेने यावर आंदोलन छेडताच शिवसेनाही मैदानात उतरली होती़ या कला दालनासाठी १०० कोटी पालिका तिजोरीतून खिरापत वाटण्यात येत असल्याचाही आरोप झाला होता़ यावर खुलासा करताना आयुक्त सीताराम कुंटे यांनी गेल्या बैठकीतील वादळी चर्चेतील हवा काढून घेतली़ वस्तुसंग्रहालयाच्या विस्तारीकरणावर चर्चा करणाऱ्या २०१२ मधील बैठकीत तत्कालीन महापौर हजर होते, याचे स्मरण करून देत आयुक्तांनी शिवसेनेवरच जबाबदारी ढकलली आहे़ (प्रतिनिधी)
कला दालनाला तीन वर्षांपूर्वी महापौरांची मंजुरी
By admin | Updated: December 17, 2014 01:46 IST