Join us
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कामगारांना उद्ध्वस्त होऊ देणार नाही

By admin | Updated: March 24, 2015 00:06 IST

भाजपा सरकार कामगारविरोधी धोरण राबवत आहे. त्यांच्याविरोधात संघर्ष करण्याची वेळ आली आहे. सरकार उलथवून टाकण्याची ताकद कामगारांमध्ये आहे.

नवी मुंबई : भाजपा सरकार कामगारविरोधी धोरण राबवत आहे. त्यांच्याविरोधात संघर्ष करण्याची वेळ आली आहे. सरकार उलथवून टाकण्याची ताकद कामगारांमध्ये आहे. कोणत्याही स्थितीमध्ये कामगारांना उद्ध्वस्त होऊ दिले जाणार नाही, असे आश्वासन माथाडी नेत्यांनी दिले.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री गणेश नाईक म्हणाले की, ‘कामगार संघटनांचे अस्तित्व टिकले पाहिजे. माथाडी कामगारांच्या हितासाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. आम्ही नेहमीच कामगारांच्या बरोबर राहिलो आहोत. यापुढेही सोबत राहणार आहोत.’ माथाडी नेते शशिकांत शिंदे यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. ‘सरकार माथाडी कायदाच रद्द करण्याच्या हालचाली करत आहे. लाक्षणिक बंद करून सरकारला इशारा देण्यात आला आहे. कामगारांच्या अस्तित्वासाठी लढा उभारण्याची वेळ आली आहे. सरकार उलथवून टाकण्याची ताकद कामगारांमध्ये असून वेळ पडली तर तीव्र लढा उभारण्यात येईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार नरेंद्र पाटील यांनीही सरकारच्या धोरणांविषयी नाराजी व्यक्त केली. ‘कामगारांनी आता नवीन संघर्षाला तयार राहिले पाहिजे. सरकार कामगार कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. कामगारांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न आहे. त्यांचा हा डाव सफल होवू दिला जाणार नाही. कामगारांच्या हक्कांसाठी तीव्र लढा उभा केला जाईल. कोणत्याही स्थितीमध्ये माथाडी कामगारांना उद्ध्वस्त होवू दिले जाणार नाही,’ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. माथाडी बोर्डामधील गोंधळाकडे गुलाबराव जगताप यांनी लक्ष वेधले. ठेकेदारी स्वरूपात कामगार भरती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बोर्डामधील कामकाज व्यवस्थित होत नाही. त्यामुळे कामगारांना वेळेवर पगार मिळत नाही. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते असेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, महापौर सागर नाईक, एकनाथ जाधव, चंद्रकांत पाटील, अनंत पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)