Join us  

प्रतिमेच्या वादात अडकलेल्या साहित्याचा कुळाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:09 AM

साहित्य क्षेत्रातील वाद हे तसे नवे नाहीत. वादे वादे जायते तत्त्वबोधः हे साहित्यनिर्मितीचे मूळ अधिष्ठान मानले जाते. वादातून संवादाकडे ...

साहित्य क्षेत्रातील वाद हे तसे नवे नाहीत. वादे वादे जायते तत्त्वबोधः हे साहित्यनिर्मितीचे मूळ अधिष्ठान मानले जाते. वादातून संवादाकडे जात असताना तत्त्वबोध होणे महत्त्वाचे असते. नेमके हेच तत्त्वबोधापर्यंत जाणे साहित्यक्षेत्रातील निर्मिक विसरले आहेत की काय, असा प्रश्न पडावा असे वातावरण खचीतच आहे.

........................

साहित्य क्षेत्रात नुकत्याच घडलेल्या एका घटनेने नवा वादाला फोडणी मिळाली आणि साहित्याला विशिष्ट प्रतिमांमध्ये बंदिस्त करणे कितपत योग्य यावर चर्चा झडू लागली. याला निमित्त ठरले ते ज्येष्ठ कवी-विचारवंत यशवंत मनोहर... विदर्भ साहित्य संघाने यशवंत मनोहर यांना ‘जीवनव्रती’ हा पुरस्कार सन्मानाने जाहीर केला. तो सन्मान स्वीकारण्यासंदर्भातील होकारही मनोहरांनी कळविला. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा कार्यक्रमाची वेळ आली तेव्हा सभागृहात सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन केले जाणार असल्याने मनोहरांनी पुरस्कार नाकारला. स्त्रिया आणि अतिशूद्रांना शिक्षणबंदी आणि ज्ञानबंदी करणाऱ्या शोषणसत्ताकांची प्रतीके नेहमीच नाकारत आलेल्या मनोहरांची ही कृती साहित्य क्षेत्रातील धुरिणांच्या डोळ्यांत अंजन घालणारीच म्हणावी लागेल. या निमित्ताने काही मूलभूत मुद्द्यांचा ऊहापोह होणे गरजेचे आहे.

मुळात मराठी साहित्यात भूमिका घेणाऱ्या साहित्यिकांची वानवा असताना मनोहरांनी घेतलेली ही भूमिका ठळकपणे उठून दिसते. सरस्वती ही बुद्धीची देवता मानली जाते. पिढ्यान‌्पिढ्या याच धारणेतून साहित्यनिर्मिती ही सरस्वतीच्या कृपेतूनच होते, हे जनमानसांत बिंबविले गेले आहे. त्यामुळेच साहित्यिक म्हणजे सरस्वतीचे पूजक, साहित्यिक म्हणजे सारस्वत असे शब्दप्रयोग सर्रास केले जातात. साहित्य संमेलनाचा उल्लेख करतानाही शारदेचा दरबार, सारस्वतांची मांदियाळी असेच उच्चरवात बोलले जाते. असे असताना, साहित्याची सेवा करणाऱ्या मनोहरांनी थेट या पिढीजात कल्पनांनाच आपल्या कृतीतून थेट आव्हान दिले आहे. यावरून साहित्य क्षेत्रात दोन्ही बाजूंनी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चा होत राहतीलही; पण साहित्याला अशा विशिष्ट प्रतिमांमध्ये अडकवणे किती योग्य याचा सांगोपांग विचार होणे गरजेचे आहे.

‘उत्थानगुंफा’सारखा प्रवर्तक कवितासंग्रह लिहिणाऱ्या यशवंत मनोहरांनी सुरुवातीपासूनच या घट्ट मूळ धरलेल्या कल्पनांना आपल्या लेखणीतून छेद दिलेला आहे.

जिंदगीने डोळ्यात आसवे आणि सूर्यानेच हातात लेखणी दिली

एका हाताने ज्वालांच्या मिठ्या सोडवल्या दुसऱ्या हाताने कविता लिहिली

असा विद्रोहाचा संयत सूर मनोहरांनी आजवर आपल्या लेखनातून लावलेला आहे. त्यामुळेच सरस्वतीच्या पूजनामुळे थेट पुरस्कारच नाकारण्याची त्यांची भूमिका त्यांच्या जीवनदृष्टीशी सुसंगतच म्हणावी लागेल.

साहित्य हे कायमच प्रतिमा आणि प्रतीकांच्या सहवासातून फुलत असते. साहित्य म्हणजे सहित, समाजाच्या सर्वच घटकांचे हित. सर्वांना सामावून घेण्याची क्षमता साहित्यात असते, असे मानले जाते. पण, साहित्यातून याच सर्वंकष हिताला बाधा पोहोचत असेल तर त्याला साहित्य तरी कसे म्हणायचे? प्रतिमा हा साहित्यनिर्मितीचा मूळ आधार. साहित्यिक याच प्रतिमांच्या जोरावर साहित्याची निर्मिती करत असतो. पण, याच प्रतिमा साहित्याच्या हेतूलाच बाधा पोहचवीत असतील, तर त्या बाजूला सारता आल्या पाहिजेत. मनोहरांच्या एका कृतीतून त्यांनी हे अधोरेखित केले आहे.

सरस्वती ही हिंदूंची आराध्यदेवता. बुद्धीचे अधिष्ठान म्हणजे सरस्वती. त्यामुळेच सरस्वतीचा उल्लेख पुराणात धीश्वरी ( धी म्हणजे बुद्धी) असा केला जातो. ब्रह्मपुराणात सरस्वतीला कुमारी मानले जाते. विष्णूच्या जिभेवर सरस्वतीची निर्मिती झाल्याची आख्यायिका आहे. म्हणूनच तिला वाक् म्हणतात, वागेश्वरी म्हणतात. स्वर्गात भारती, पृथ्वीवर वाग्देवता, अंतरिक्षात सरस्वती आणि तंत्रविद्येत तारा असे उल्लेख सरस्वतीचे केले जातात. ऋग्वेदात सरस्वतीला नदी मानले आहे. ही सरस्वती हृदयात गुप्त असते, पण साकारते वाणीतून... त्यामुळेच साहित्यनिर्मितीच्या प्रक्रियेत साहित्यिकांच्या हृदयात गुप्त असलेला आशय जेव्हा कागदावर अभिव्यक्त होतो, तेव्हा तो सरस्वतीचाच आविष्कार मानला जातो. आता त्याला तुम्ही देवदेवतांच्या प्रतिकांत बंदिस्त करून सनातन परंपरेच्या जोखडात अडकवत राहायचं की लेखनाची प्रेरणा देणाऱ्या त्या अदृश्य शक्तीचा आदर करत समाजहिताच्या दृष्टीने साक्षेपी मांडणी करण्याचा प्रयत्न करायचा, हा ज्याच्या त्याच्या बौद्धिक क्षमतेचा प्रश्न आहे. नाही तरी विश्वाचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा असे म्हणतातच की...

एकूणच काय, तर साहित्याच्या सागरात आकंठ बुडायचे असेल तर विविध विचारप्रवाहांना वाहते ठेवावेच लागेल. जशा नद्या आपापल्या प्रवाहातून वाहत वाहत समुद्राला मिळतात, तसेच, साहित्याचेही हे वेगवेगळे प्रवाह जरी स्वतंत्र असले तरी त्यांचे अंतिम साध्य हे समृद्ध आशयसागरात विलीन होणे हेच आहे. दिंड्यांच्या पताका कोणत्याही रंगांच्या असोत, जोपर्यंत अंतरंगात सहितभाव आहे, तोपर्यंत साहित्य सर्व रंगांत रंगत जाईल. मात्र, हाच सहितभाव हरवला तर या रंगाचा बेरंग व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आपण आपल्या कुळाचारांनाच कुरवाळत बसायचे की नव्या आशयाच्या शोधात मुळापर्यंत जाऊन विवेकाचे बीज रुजवायचे याचा विचार होणे गरजेचे आहे.

- दुर्गेश सोनार