Join us  

सकाळी ९ ते १0 प्रवासाला प्रचंड गर्दी

By admin | Published: September 03, 2015 2:14 AM

सकाळी लोकल पकडण्याची घाई, त्यातच खच्चून भरलेल्या लोकल आणि गर्दीमुळे काही वेळेला लोकल पकडणेही झालेले अशक्य. वाढलेल्या गर्दीतून प्रवाशांचा प्रवास सुकर करण्याचे मोठे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर आहे.

मुंबई : सकाळी लोकल पकडण्याची घाई, त्यातच खच्चून भरलेल्या लोकल आणि गर्दीमुळे काही वेळेला लोकल पकडणेही झालेले अशक्य. वाढलेल्या गर्दीतून प्रवाशांचा प्रवास सुकर करण्याचे मोठे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर आहे. मात्र हा प्रवास सुकर करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेला जवळपास २00 पेक्षा जास्त फेऱ्या कमी पडत असल्याचे सांगण्यात आले आहे. यात तर सकाळी ९ ते सकाळी दहा ही वेळ गर्दीची असून त्यावर नियंत्रण आणणार कसे, असा प्रश्न रेल्वेला पडला आहे. यात पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते विरार आणि मध्य रेल्वेवरील ठाण्यापुढील (डाऊन दिशेला) प्रवास जिकिरीचा झाला आहे. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर ७६ लोकल धावत असून त्याच्या १,३00 फेऱ्या आणि मध्य रेल्वे मार्गावर १४२ लोकल धावत असून त्याच्या १,६00 फेऱ्या होतात. या फेऱ्यांमधून दिवसाला जवळपास ८0 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. प्रवाशांची असणारी संख्या पाहता होणाऱ्या लोकल फेऱ्याही कमी पडत आहेत. यात तर मध्य रेल्वे मार्गावर सध्याच्या घडीला १३२ फेऱ्या कमी पडत असून यात ठाणे ते कर्जत, कसारा दरम्यान आणि ठाणे-वाशी, पनवेल दरम्यानचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते विरार दरम्यानही बरीच गर्दी वाढली असून जवळपास ७0 ते ८0 फेऱ्या कमी पडत असल्याचे पश्चिम रेल्वेचे अधिकारी सांगतात. एकूणच प्रवाशांची वाढणारी गर्दी पाहता प्रवाशांना प्रवास नकोसा झाला आहे. एमआरव्हीसीकडून मुंबईतील लोकलच्या गर्दीवर एक सर्व्हे करण्यात आला होता. याबाबत एमआरव्हीसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले की, सीएसटी आणि चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांना सकाळच्या वेळी प्रचंड गर्दी होत आहे. ही गर्दी एवढी होत आहे की तासाला लाखो प्रवासी जलद आणि धिम्या लोकलमधून प्रवास करताना दिसतात. एमआरव्हीसीने केलेल्या सर्वेक्षणात सकाळी ९ ते सकाळी १0 या वेळेत तब्बल ६ लाख ७ हजार ८४६ प्रवासी प्रवास करतात. यात धिम्या लोकल फेऱ्यांमधून ३ लाख ६३ हजार ५0 तर जलद लोकलमधून २ लाख ४४ हजार ७९६ प्रवासी प्रवास करत आहेत. तर सकाळी ८ ते सकाळी ९ या वेळेत ५ लाख ८३ हजार प्रवासी प्रवास करत असून त्यानंतरची गर्दीची वेळ ही सकाळी १0 ते सकाळी ११ ची असल्याचे सांगण्यात आले. सीएसटी आणि चर्चगेटहून डाऊन दिशेला जाताना होणारी गर्दी ही संध्याकाळी सहा ते संध्याकाळी ७ या वेळेत होत आहे. या वेळेत जवळपास सहा लाख प्रवासी प्रवास करतात. त्याचप्रमाणे रात्री सात ते आठ ही वेळही गर्दीची असल्याचे सांगण्यात आले.