Join us  

विवाहितेची दहा वर्षांच्या मुलासह आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:06 AM

विवाहितेची दहा वर्षांच्या मुलासह आत्महत्याइमारतीच्या बाराव्या इमारतीवरून मारली उडीसुसाईड नोट सापडली; साकिनाका पोलिसांकडून चौकशीलोकमत न्यूज नेटवर्क...

विवाहितेची दहा वर्षांच्या मुलासह आत्महत्या

इमारतीच्या बाराव्या इमारतीवरून मारली उडी

सुसाईड नोट सापडली; साकिनाका पोलिसांकडून चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अंधेरीच्या साकिनाका परिसरात सोमवारी रेश्मा त्रेंचिल (४४) नामक महिलेने तिचा मुलगा गरूड (१०) याच्यासह इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. कोरोनाने पतीचा मृत्यू झाल्यामुळे निराशेने त्यांनी हे पाऊल उचलल्याचा प्रथमदर्शनी संशय होता. मात्र शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटवरून उघडकीस आले असून पोलिसांनी शेजारी शादाब अयुब खान (३३) याला अटक केली. चांदिवलीच्या नहर अमृत रोडवरील तुलिपिया इमारतीत हा प्रकार घडला. शरद मुलूकुटला असे रेश्मा यांच्या पतीचे नाव होते, ते एका ऑनलाइन ट्रेडिंग विभागात प्रमुख म्हणून कार्यरत होते. रेश्मा या गृहिणी हाेत्या. आईवडिलांना कोरोनाची लागण झाल्याने शरद त्यांच्या सेवेसाठी वाराणसीला गेले हाेते. दुर्दैवाने त्यांनाही कोरोना झाला आणि चार आठवडे मृत्यूशी त्यांनी दिलेली झुंज अपयशी ठरली. त्यामुळे रेश्मा यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर सोमवारी रेश्मा यांनी हे पाऊल उचलले. यात मायलेक दोघांचाही मृत्यू झाला.

रेश्मा यांनी फेसबुकवर ३० मे, २०२१ रोजी एक भलीमोठी पोस्ट टाकली होती. यात शरदशिवाय जगणे किती असह्य आहे याचा उल्लेख केला होता. त्यांच्या पोस्टवरून पतीला गमावल्याचे दुःख त्या सहन करू शकत नव्हत्या आणि परिणामी त्यांनी आत्महत्या केली, असा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र सुसाईड नोटमध्ये त्या घरात वावरण्याचा आवाज त्या राहत असलेल्या खालच्या फ्लॅटमधील रहिवासी खान, त्याची पत्नी शहनाझ खान व शादाब खान यांना होत असल्याचे सांगत ते सोसायटी व पोलिसांना वारंवार तक्रार करत होते. यामुळे रेश्मा कंटाळल्या होत्या आणि त्यांनी मृत्यूला कवटाळले हे उघड झाले. त्यानुसार शादाबला अटक करण्यात आली.