Join us  

मार्गशीर्षच्या खरेदीसाठी बाजारपेठा हाउसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:35 PM

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारनिमित्त दादर मार्केटमध्ये बुधवारी फुले, फळे, पुजेचे साहित्य, पोथी, देवीचे मुखवटे खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती.

मुंबई : मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारनिमित्त दादर मार्केटमध्ये बुधवारी फुले, फळे, पुजेचे साहित्य, पोथी, देवीचे मुखवटे खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. दादर मार्केटसह कुर्ला, भायखळा, लालबाग, घाटकोपर आदी मार्केटमध्येही खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती.पुजेसाठी लागणारी वेणी १० ते २० रुपये दराने विकली जात होती. पुजेसाठी लागणारे पाच प्रकारची पाने पाच ते दहा रुपये किंमतीला विकली जात होती. पुजेसाठी पाच विविध फळे ४० रुपये भावाने विकली जात होती. यात आंबा, वड, चिकू, पेरु आणि जांभूळ झाडांची पाने एकत्रित करुन त्यांचा गुच्छा विकला जातो, अशी माहिती वैतरणामधून आलेल्या मंजू पाटील यांनी दिली. देवीचे मुकुट १०० रुपयांपासून ते ९०० रुपयेपर्यंत विक्री सुरु होती. देवीची चुनरी ६० ते २०० रुपये भावाने विकली जात होती. कोवळ््या नारळाला देवीचे रुप देऊन ८० रुपयाप्रमाणे नारळ विकला जात होती. देवीची स्थापना करण्यासाठी लागणारा पत्र्याचा पाठ १५० ते ४०० रुपयांपर्यंत भाव होता. लाकडाचा पाठ ३०० रुपये होता, अशी माहिती विक्रेत्यांने दिली.दादर येथील मीनाताई ठाकरे फुल मार्केटचे संचालक दादाभाऊ येणारे यांनी यासंदर्भात सांगितले की, गावामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस न पडल्यामुळे बाजारात फुलांची आवक फारच कमी आहे. पिवळा गोंडा ६० ते ८० रुपये किलो, नामधारी लाल गोंडा ६० रुपये किलो, कलकत्ता गोंडा ६० रुपये किलो, अष्टरची फुले १५० ते २०० रुपये शेकडा, चांदणी शेवंती ८० रुपये किलो, पौर्मिणा फुले ६० रुपये किलो आणि गुलछडी फुले १०० रुपये किलो असा फुलांचा भाव सध्या मार्केटमध्ये सुरु आहे.तांबा, पितळ, चांदीचे दिवेही उपलब्धबाजारात तांबा, पितळ आणि चांदीचे दिवे खरेदीसाठी ठेवण्यात आले आहेत. पितळ आणि तांब्याचे साधे दिवे ३० ते ३०० रुपये प्रमाणे विक्री सुरु आहे. डायमंड दिवे हे २२० ते १५०० रुपयांपर्यंत विकले जात आहेत. तांब्याचा कळस ३५० ते ११०० रुपयांपर्यंत विकला जात आहे, अशी माहिती विक्रेते गणपत जाधव यांनी दिली.

टॅग्स :मुंबई