मुंबई : ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीने मोहर उमटवली आहे. त्यामुळे ‘कोर्ट’, ‘किल्ला’, ‘एलिझाबेथ एकादशी’ असो वा ‘मित्रा’ या सर्वच कलाकृतींना पुरस्कार मिळाल्याने मराठी सिने-नाट्यसृष्टीत आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील हे सीमोल्लंघन स्वागतार्ह असून उत्तरोत्तर मराठीने सिनेनाट्यसृष्टी यशस्वी होवो, अशा प्रतिक्रिया मराठीतील आघाडीच्या मान्यवरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या आहेत.पुरस्कार मिळाल्याचा खूपच आनंद आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आधारित ‘कोर्ट’ हा पहिला चित्रपट आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अवकाश संकुचित होताना काय परिस्थिती होते आणि त्या वेळी व्यवस्था कशी बाधित होते याचे उत्तम चित्रण या सिनेमात आहे. भारतातील सामान्य माणसाचा लढा, त्यांचे प्रश्न, तळागाळातील सामान्यांचे चित्रण या सिनेमातून अधोरेखित होते. या सिनेमात हीरो-हीरोइन नाही. ‘सामान्य’ माणूस हाच फोकस आहे. त्यामुळे मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील हा पहिलाच प्रयोग आहे. या सिनेमातील संगीताच्या बाबतीतही ‘रॉनेस’ आम्ही टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. - संभाजी भगत, शाहीर१कोर्टाची पायरी चढणाऱ्या माणसांचे आयुष्य आणि लोककला यांची सांगड ‘कोर्ट’ या चित्रपटात घातली आहे. एका लोककलाकाराला कोर्टात जाण्याची वेळ येते व त्याच्यावर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहण्याची वेळ येते. या अनुषंगाने या चित्रपटात भाष्य केले आहे. चैतन्य ताम्हाणे याने या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. यात लोककलावंताची भूमिका करणारे वीरा साथीदार हे चळवळीतले कार्यकर्ते आहेत. त्यांच्यासह विवेक गोम्बर, उषा बने आणि गीतांजली कुलकर्णी यांच्या चित्रपटात भूमिका आहेत.‘मित्रा’ चित्रपट तयार करणे म्हणजे खरेच मोठ्ठे चॅलेंज होते. मला एका वेगळ्याच विषयावर चित्रपट तयार करायचा होता. कवीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. म्हणून मी संदीप खरेच्या ‘उदासित’ या कवितेवर काम करण्याचे ठरवले. याच दरम्यान विजय तेंडुलकरांची ‘मित्रा’ ही कादंबरी वाचण्यात आली. म्हणूनच हा लघुपट करण्याचे ठरवले. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातील कृष्णधवल रंगात हा लघुपट आहे. टाइमपास २ च्या प्रदर्शनाआधी ही गोड बातमी आली असल्याने सर्वच टीम सदस्य आनंदात आहेत.- रवी जाधव, दिग्दर्शक२राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याआधीच हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजला गेला होता. एकूण १७ पुरस्कारही त्याला मिळाले आहेत. मेक्सिको, सिंगापूर, सर्बिया, मॉस्को अशा अनेक ठिकाणच्या महोत्सवांत या चित्रपटाने पुरस्कार मिळवले आहेत.३या चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी आतापर्यंत केवळ एक लघुपट आणि एक माहितीपट केला असून, त्यांचे हे दिग्दर्शनातले पहिले पाऊल आहे. या अनुभवाविषयी बोलताना ते म्हणतात, आम्ही सगळे सेटवरच शिकत गेलो. अनेकदा ३०-४० रिटेक्सही आम्ही केले. मला संशोधन करण्याची आवड आहे आणि कोर्ट या विषयावर अभ्यास करण्यासाठी मी बरेच वेळा कोर्टात जाऊन बसायचो आणि निरीक्षण करायचो. त्या अनुभवातून हा चित्रपट तयार झाला आहे. साडेतीन वर्षे मी हा अभ्यास केला. त्याचे फळ आता मला पुरस्काराच्या रूपाने मिळत आहे. या चित्रपटाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हा आमच्या टीमसाठी महत्त्वाचा आहे.एका मुलाने घेतलेला स्वत:चा शोध, यावर दृष्टिक्षेप टाकणारा हा चित्रपट आहे. या मुलाचे वडील हयात नाहीत, आई सरकारी नोकरीत आहे. तिची बदली कोकणातल्या एका गावात होते. तिथे या मुलाला काही मित्र भेटतात. ते एकदा तिथल्या किल्ल्यापर्यंत सायकलची शर्यत लावतात. या अनुभवातून त्याला जगण्याचे मर्म सापडते, अशा आशयाची कथा या चित्रपटात गुंफली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अविनाश अरु ण यांनी केले आहे. मूळचे सिनेमॅटोग्राफर असलेले अविनाश अरु ण यांनी दिग्दर्शनासह या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफीसुद्धा केली आहे. यात पार्थ भालेराव, अमृता सुभाष, सविता प्रभुणे, अर्चित देवधर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला पुरस्कार मिळाला असून, गेल्या वर्षी मुंबईत आयोजित केलेल्या मामि फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला होता. मराठी सिनेमांचा बोलबाला‘मराठीत तयार होणारे चित्रपट देश-विदेशात पताका फडकावत आहेत. मागील काही वर्षांपासून मराठी सिनेमांचाच बोलबाला सर्वत्र आहे. मराठी सिनेमा कोणत्याही भाषेतील सिनेमांपेक्षा कमी नाही हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले.- सिद्धार्थ जाधव, अभिनेता‘कोर्ट’च्या टीमसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. कोणताही मोठा कलाकार यात नसूनही याआधीच विदेशातून अनेक अॅवॉर्ड्स मिळाले आहेत. मात्र भारत सरकारकडून मिळालेला हा सन्मान, कलाकृतीचे केलेले कौतुक अत्यंत प्रेरणादायी आहे.’- चैतन्य ताम्हाणे, दिग्दर्शक (कोर्ट)मराठी चित्रपटांची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. राष्ट्रीय पातळीवर दोन सर्वोत्कृष्ट सिनेमांना हा पुरस्कार मिळाल्याचा आनंदही आहे. स्वत:ची सिनेमॅटिक भाषा तयार करणारे हे सिनेमे आहेत. सिनेमासाठी असणारे नियम आणि चाकोरीबद्धता मोडून हे दोन्ही सिनेमे तयार केलेले आहेत. त्यामुळे ‘कोर्ट’ असो वा ‘किल्ला’ हे दोन्हीही सिनेमे खूपच उत्तम आहेत.- उमेश कुलकर्णी, दिग्दर्शकमराठी सिनेमांचे सर्वच स्तरांवरून होणारे कौतुक पाहून आनंद होतो. कोर्ट, एलिझाबेथ एकादशी, किल्ला, मित्रा या सर्वच चित्रपटांच्या टीमचे अभिनंदन.- संजय जाधव, दिग्दर्शक‘कोर्ट’ चित्रपट ‘मामि चित्रपट महोत्सवात मी पाहिला होता. अत्यंत उत्कृष्ट असा सिनेमा आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मिळालेला पुरस्कार योग्यच आहे. मराठी सिनेमाला पुन्हा सोनेरी क्षण आलेत.- आदिनाथ कोठारे, अभिनेता