Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी पाट्यांसाठी आणखी मुदतवाढ हवी; दुकानदारांची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 08:51 IST

दुसरीकडे ज्यांनी दुकानांवर मराठीत पाट्या बसविल्या नाहीत, त्यांच्यावर सोमवारपासून पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील दुकानांवरील पाट्या मराठीत लावण्यासाठी व्यापाऱ्यांना दिलेली मुदतवाढ संपली आहे. मात्र, अद्यापही ५० टक्के दुकानदारांनी या नियमाची अंमलबजावणी केली नाही. अजूनही व्यापाऱ्यांना मराठीमध्ये पाट्या लावण्यासाठी पुरेसा वेळ हवा आहे. शहर आणि उपनगरांत ५० टक्के दुकानांवर मराठीत पाट्या लागल्याचा दावा व्यापारी संघटनांनी केला आहे, तर उर्वरित दुकानांवर पाट्या लावण्यासाठी पुन्हा मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पुन्हा व्यापारी संघटनांकडून होत आहे. 

दरम्यान, दुसरीकडे ज्यांनी दुकानांवर मराठीत पाट्या बसविल्या नाहीत, त्यांच्यावर सोमवारपासून पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथील राजकीय वातावरण विविध मुद्द्यांवरून तापत असतानाच दुसरीकडे मराठी पाट्यांचा मुद्दा सातत्याने समोर येत आहेत. महापालिकेच्या नियमानुसार मुंबईतल्या आतापर्यंत ५० टक्के दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात आल्या असल्या तरी अद्याप ५० टक्के दुकानांवर मराठी पाट्या लागणे शिल्लक आहे. त्यामुळे ज्या दुकानांवर मराठी पाट्या लागलेल्या नाहीत, अशा दुकानांवर आता सोमवारपासून महापालिका वेगाने कारवाई करणार आहे. मराठी आकार नसलेल्या दुकानदारांसह इतर व्यापाऱ्यांना सात दिवसांची नोटीस दिली जाणार आहे आणि तरीही मराठी पाटी लागली नाही तर त्या दुकानदारांवर कारवाई केली जाणार आहे.

    महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक विभागात या पद्धतीने कारवाई केली जाणार आहे.     मुंबईतल्या दुकानांवर मराठी पाट्या लागाव्यात म्हणून महापालिकेने तीन वेळा मुदत वाढवून दिली आहे.     मुदत संपली आहे. परिणामी महापालिका आता मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर कारवाई करणार आहे.     मान्सून कालावधी आणि इतर अनेक कारणे देत व्यापारी संघटनांनी मुदत वाढवून देण्याचा मागणी केली होती.     मुदत ३० सप्टेंबरपर्यत वाढवून देण्यात आली होती. तत्पूर्वी मराठी नामफलकांची पूर्तता करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.     दुकानांवरील नामफलक प्रथमदर्शनी मराठी देवनागरी लिपीत व इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा मोठ्या आकारात दिसावा.     प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असला पाहिजे.     मराठी भाषेतील अक्षरलेखन हे नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक आहे.     मराठी भाषेतील अक्षरांचा आकार लहान असता कामा नये.