Join us  

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी मनुष्यबळ तुटपुंजे; माहिती अधिकारात उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 3:18 PM

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे अनधिकृत फेरीवाल्यांची अनधिकृत अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी कर्मचारी वृंदाची माहिती विचारली होती.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड स्तरावर अनधिकृत फेरीवाल्यांची अनधिकृत अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी मनुष्यबळ तुटपुंजे असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 505 पैकी 88 पदे रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे अनधिकृत फेरीवाल्यांची अनधिकृत अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी कर्मचारी वृंदाची माहिती विचारली होती. अनुज्ञापन अधीक्षक यांच्या कार्यालयाने अनिल गलगली यांस कळविले की अनुज्ञापन खात्याच्या आस्थापनेवर अनधिकृत फेरीवाल्यांची अनधिकृत अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी कर्मचारी वृंदात वरिष्ठ निरीक्षक ( अतिक्रमण निर्मूलन), निरीक्षक ( वाहन) आणि कामगार अशी पदे आहेत. यात सर्वात जास्त रिक्त पदे कामगारांची असून त्याची संख्या 81 आहे. मंजूर पदे 373 असून सद्या कार्यरत संख्या 292 आहे. वरिष्ठ निरीक्षक ( अतिक्रमण निर्मूलन) ही 25 मंजूर पदे असून 5 पदे रिक्त आहेत तर निरीक्षक ( वाहन) यांची मंजूर पदे 107 असून सद्यस्थितीत 105 पदे कार्यरत आहेत.

अनिल गलगली यांच्या मते मंजूर संख्या मुंबईतील वाढलेल्या फेरीवाल्यांच्या तुलनेत कमी आहे. याकामी क्लीन अप मार्शल यांचे सहकार्य घेणे आवश्यक आहे. याबाबत अनिल गलगली यांनी महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इकबालसिंह चहल यांना पत्र पाठवुन रिक्त पदे भरण्याची आणि क्लीन अप मार्शल यांचे सहकार्य घेण्याची विनंती केली आहे.