Join us  

मुंबईकरांनो, झाडांना खिळे मारून त्यांना वेदना देऊ नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 2:56 AM

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राष्ट्र सेवा दल (गोरेगाव विभाग) व आंघोळीची गोळी टीम यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सकाळी गोरेगाव पश्चिमेकडील एस.व्ही. रोडवरील सिटी सेंटर येथे खिळेमुक्त आणि वेदनामुक्त झाडे ही मोहीम राबविण्यात आली.

मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राष्ट्र सेवा दल (गोरेगाव विभाग) व आंघोळीची गोळी टीम यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सकाळी गोरेगाव पश्चिमेकडील एस.व्ही. रोडवरील सिटी सेंटर येथे खिळेमुक्त आणि वेदनामुक्त झाडे ही मोहीम राबविण्यात आली. गोरेगावमध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत एकूण ३० झाडांवरून एक डबा खिळे व इतर लोखंडी वस्तू काढण्यात आल्या. तसेच महालक्ष्मीतही ही मोहीम राबविली असून एकूण १० ते १५ झाडांमधून खिळे काढण्यात आले.प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बदल या चार तत्त्वावर आंघोळीची गोळी ही मोहीम आधारित आहे. आंघोळीची गोळी मोहीम मुंबईत १ एप्रिलपासून सुरू झाली. गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईतल्या ४८० झाडांना खिळेमुक्त करण्यात आले आहे. दादर येथील शिवसेना भवन, मेट्रो सिनेमा, महालक्ष्मी, गोरेगाव, कल्याण, डोंबिवली, विरार या ठिकाणीही मोहीम राबविण्यात आली आहे. आतापर्यंत झाडांमधून ३५०हूनअधिक खिळे, लोखंडी रॉड, स्क्रुड्रायव्हर, लोखंडी पट्ट्या आणि स्टॅप्लर पिन इत्यादी वस्तू काढण्यात यश आले आहे. ज्या वेळी झाडांना खिळे मारले जातात त्या वेळी खिळे थेट झाडांच्या नसांमध्ये मारले जातात. परिणामी, झाडांमधून आॅक्सिजन बाहेर येण्याचे प्रमाण कमी होते. तसेच झाडांना खिळे मारल्याने त्यांचे आयुष्यदेखील कमी होते, असे मोहिमेच्या सदस्यांकडून सांगण्यात आले.इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स यांच्या अभ्यासानुसार १९७० साली मुंबईमध्ये ३५ टक्के झाडांचा हिरवा पदर होता. परंतु आता १३ टक्क्यांहून खाली हा आकडा आला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सच्या म्हणण्यानुसार, लोकसंख्येच्या तुलनेत ३३ टक्के झाडे शहरात असली पाहिजेत. कारण आॅक्सिजनची मात्रा सुरळीत चालण्यासाठी इतकी झाडे असणे आवश्यक आहे. मुंबईमध्ये २९ लाख ७५ हजार ८२३च्या आसपास झाडांची संख्या आहे. जर लोकसंख्या बघायला गेलो तर मुंबईत एका झाडामागे चार व्यक्ती श्वास घेत आहेत. झाडांचे कुंपण हे मातीचे असावे, मात्र शहरात झाडांचे कुंपण कॉँक्रिटचे असल्यामुळे झाडे मुळासकट कुजतात आणि धोकादायक ठरविली जातात, अशी माहिती आंघोळीची गोळी टीमचे कार्यकर्ते तुषार वारंग यांनी दिली.मोहिमेतून जनजागृतीविरारमध्ये खिळेमुक्त मोहीम सुरू असताना एका दुकानदाराने विचारले की, तुम्ही झाडांवरून काय काढत आहात? तेव्हा त्या दुकानदाराला मोहिमेची सर्व माहिती देण्यात आली. तेव्हा त्यानेही शपथ घेतली की माझ्या दुकानासमोरील दोन झाडांची जबाबदारी आजपासून माझी असेल. या झाडांवर कोणालाही खिळे मारू देणार नाही आणि स्वत:ही मारणार नाही.

टॅग्स :मुंबई