Join us  

विमान कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्याचा वापर अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:06 AM

हवाई वाहतूक मंत्रालय; प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड नाहीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरीही ...

हवाई वाहतूक मंत्रालय; प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरीही विमानात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षा साहित्याचा वापर करणे बंधनकारक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसून, हा नियम प्रत्येक केबिन क्रू मेंबरला लागू असल्याचे हवाई वाहतूक विभागाने म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांत कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर देशांतर्गत विमानसेवा देणाऱ्या काही कंपन्यांनी कोरोना प्रतिबंधासाठी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा साहित्यात कपात केल्याच्या चर्चा सुरू होत्या. सुरक्षा साहित्यावरील खर्च कमी करून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सवलती दिल्या जात असल्याचेही समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर हवाई वाहतूक विभागाने विमान कर्मचाऱ्यांसाठी आखून दिलेल्या नियमावलीची पुन्हा आठवण करून दिली आहे.

त्यानुसार, विमान उड्डाणादरम्यान सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षात्मक दृष्टीने परिपूर्ण असा पोशाख परिधान करावा. पूर्ण शरीर झाकले जाईल, अशा प्रकारचे पीपीई किट वापरावे, बुटांसाठी कव्हर, मास्क आणि हातमोजे घालावेत. हे सर्व साहित्य जागतिक आरोग्य संघटना किंवा आयसीएमआर यांनी मान्यता दिलेल्या संस्थेकडून घेण्यात यावे.

प्रवाशांना खानपान सुविधा देणाऱ्या किंवा त्यांच्याशी थेट संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी. त्यांनी परिधान केलेले मास्क एन-९५ आणि तीन लेअरचे असावे. प्रवाशांना सेवा देताना फेसशिल्ड, गॉगल आणि हातमोजे घालावेत. एकदा वापरात येणारा ॲप्रोन पीपीई किटभोवती गुंडाळण्यात यावा. कार्यमुक्त झाल्यानंतर पीपीई किटची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. वैमानिकांसह प्रत्येक कर्मचाऱ्याने शारीरिक अंतर राखले जाईल, याची पुरेपूर काळजी घ्यावी, असे नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.