Join us  

अंदमानात मराठी साहित्याची मांदियाळी

By admin | Published: September 05, 2015 2:15 AM

मराठी साहित्याची मांदियाळी अंदमानात रंगणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा ५ सप्टेंबर रोजी अंदमानमधील पोर्ट ब्लेअर येथे आरंभ होणार आहे.

मुंबई: मराठी साहित्याची मांदियाळी अंदमानात रंगणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा ५ सप्टेंबर रोजी अंदमानमधील पोर्ट ब्लेअर येथे आरंभ होणार आहे. ५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. अंदमानचे उपराज्यपाल (निवृत्त) ए. के. सिंग, केंद्रीयमंत्री अनंत गीते यांची यावेळी उपस्थिती असेल. प्राध्यापक शेषराव मोरे हे संमेलनाध्यक्ष असून, खासदार राहुल शेवाळे हे स्वागताध्यक्ष आहेत. डॉलीगंज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हे संमेलन होईल.शनिवारी सकाळी ७.३० वाजता सेल्युलर जेल ते महाराष्ट्र मंडळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येईल. शिवाय महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि सेल्युलर जेल परिसरात भव्य रांगोळी काढण्यात येणार आहे.शनिवारी संमेलनादरम्यान सावरकरांची महती सांगणारे कार्यक्रम दिवसभर सादर होतील. ‘मला उमगलेले सावरकर’ या परिसंवादासह प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली ‘अभिव्यक्ति स्वातंत्र्य’ या विषयावर परिसंवाद होईल. महत्त्वाचे म्हणजे यावेळी निकोबार येथील आदिवासींचे नृत्य सादर होणार आहे. संमेलनासाठी देशभरातून सावरकरप्रेमींचे जथ्थे अंदमानात दाखल झाले आहेत. ३५० प्रतिनिधी संमेलनासाठी दाखल झाले आहेत. शिवाय खासगीरित्या नोंदणी झालेले सुमारे १५० प्रतिनिधी संमेलनात सहभागी होणार आहेत.