Join us  

मल्लखांब एकाग्रता व स्नायूंमधील ताकद वाढविणारा शिस्तीचा खेळ - अरविंद प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मल्लखांब हा सर्व स्पर्धात्मक खेळांची सुरुवात असणारा क्रीडा प्रकार आहे. मल्लखांबामुळे मज्जासंस्था चांगली राहून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मल्लखांब हा सर्व स्पर्धात्मक खेळांची सुरुवात असणारा क्रीडा प्रकार आहे. मल्लखांबामुळे मज्जासंस्था चांगली राहून शरीराची लवचिकता व स्नायूंची बळकटी वाढते. त्यामुळे मुलांनी लहानपणापासूनच मल्लखांब हा क्रीडा प्रकार शिकण्यास सुरुवात करायला हवी. मल्लखांब खेळामुळे एकाग्रता व स्नायूंमधील ताकद वाढते. यामुळे आपल्याला दुसरे खेळ खेळताना त्याचा फायदा होतो. मल्लखांब हा अत्यंत शिस्त असणारा क्रीडा प्रकार आहे. असे मत प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे व अंधेरी मल्लखांब संघाचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी व्यक्त केले. श्री पार्लेश्वर व्यायामशाळा यूट्यूब चॅनलच्या वतीने रविवारी इंटरॅक्शन विथ स्पोर्ट्स सेंटर प्रेसिडेंट या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की मल्लखांब या क्रीडा प्रकाराला एक चांगला दर्जा दिला जावा यासाठी माझी आई डॉ. पुष्पा रमेश प्रभू यांनी महापौर व वडिलांच्या नावाने मल्लखांबाच्या स्पर्धा भरविण्यास सुरुवात केली. या स्पर्धांचा दर्जा चांगला असायला हवा असा आईचा नेहमी हट्ट असायचा. जेवढ्या चांगल्या दर्जाचा खेळ आपण बघतो तेवढा तो खेळण्यासाठी आपण प्रोत्साहित होतो. याद्वारे आम्ही नवीन मुलांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी आजही संकुलात आम्ही कमीत कमी पैशात जास्तीत जास्त सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न करतो.

या चर्चासत्राचे सूत्रसंचालन मल्लखांब संघ अंधेरीचे सचिव व श्री पार्लेश्वर व्यायामशाळेचे प्रशिक्षक गणेश देवरुखकर यांनी केले. तसेच या चर्चासत्रासाठी महेश अटाळे यांनी पुढाकार घेतला.