Join us  

मालेगाव बॉम्बस्फोट; माजी लष्करी अधिकारीही फितूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2023 10:23 AM

ले. कर्नल पुरोहितचा मित्र असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोट खटला चालविणाऱ्या विशेष न्यायालयाने बुधवारी एका माजी लष्करी अधिकाऱ्याला ‘फितूर साक्षीदार’ म्हणून घोषित केले. आतापर्यंत या खटल्यात ३४ साक्षीदार फितूर झाले आहेत. हा साक्षीदार खटल्यातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितचा मित्र असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे.

या साक्षीदाराने राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. एटीएस अधिकाऱ्यांनी दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदविण्यासाठी धमकावल्याचे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. एनआयएला दिलेल्या जबाबात संबंधित साक्षीदाराने म्हटले आहे की, २००६ मध्ये जेव्हा ते पुरोहितला भेटले होते, तेव्हा पुरोहितने त्यांना अभिनव भारतमध्ये सहभागी होण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना पुणे येथे पुरोहितच्या घरी बोलवण्यात आले. तिथे काही अज्ञात व्यक्ती आणि पुरोहित यांच्यात बैठक झाली. त्या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाबाबत चर्चा करण्यात आली, अशी माहिती साक्षीदाराने एनआयएला दिली होती.

पुरोहित सध्या लष्करात अधिकारी आहे. लष्करी गुप्तचर विभागात काम करत असताना कामाचा एक भाग म्हणून तो अभिनव भारताशी जोडला आणि त्यांच्या कटाची माहिती तो आपल्या वरिष्ठांना द्यायचा, असा दावा त्याने केला आहे. मात्र, तपास यंत्रणेने त्याचा दावा फेटाळला आहे.

टॅग्स :मालेगाव बॉम्बस्फोट