Join us  

मालेगाव २००८ बॉम्बस्फोट, खटल्यास विलंब होणार नाही, याची खात्री करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 5:37 AM

मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाच्या खटल्याला आणखी विलंब होणार नाही, याची खात्री करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने विशेष एनआयए न्यायालयाला सोमवारी दिले.

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाच्या खटल्याला आणखी विलंब होणार नाही, याची खात्री करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने विशेष एनआयए न्यायालयाला सोमवारी दिले.२९ सप्टेंबर, २००८ रोजी मालेगाव येथील मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला, तर १०० जण जखमी झाले होते. या खटल्याची पुढील सुनावणी २६ आॅक्टोबर रोजी आहे. त्या वेळी कोणत्याही कारणास्तव खटला तहकूब केला जाणार नाही, याची काळजी घ्या, असे निर्देश न्या. एस. एस. शिंदे व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने एनआयएचे वकील संदेश पाटील यांना दिले. विशेष न्यायालय २६ आॅक्टोबर रोजी आरोपींवर आरोप निश्चित करण्याची शक्यता आहे.मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी समीर कुलकर्णी याने हा खटला जलदगतीने व दैनंदिन घेण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यावर न्यायालयात सोमवारी सुनावणी होती. या खटल्यावर दैनंदिन सुनावणी घेण्यात यावी, ही कुलकर्णींची विनंती मान्य करण्यास न्यायालयाने नकार दिला. २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा खटला जलदगतीने घेण्याचे निर्देश आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची काळजी विशेष न्यायालयाने घ्यावी, असे न्यायालयाने म्हटले.२६ आॅक्टोबर रोजी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर आरोप निश्चिती करण्यात येणार आहे. या सर्वांवर बेकायदा हालचाली कायद्यांतर्गत व भारतीय दंडसंहितेतील काही कलमांतर्गत खटला चालविण्यात येणार आहे. हत्या व कट रचल्याचा आरोप आहे.

टॅग्स :न्यायालय