Join us  

मुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी तीन तास बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 5:42 AM

इन्स्ट्रुमेंट लँडिंग सीस्टिम (आयएलएस) मध्ये सुधारणा करण्याच्या कामासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी शनिवारी दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे हवाई वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

मुंबई - इन्स्ट्रुमेंट लँडिंग सीस्टिम (आयएलएस) मध्ये सुधारणा करण्याच्या कामासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी शनिवारी दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे हवाई वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. रात्री ९ वाजेपर्यंत विमानतळावर येणाऱ्या विमानांना सरासरी ३२ मिनिटे उशीर होत होता, तर एकूण विमानांच्या २४ टक्के म्हणजे ११३ विमानांचे आगमन उशिराने झाले. विमानतळावरून उड्डाण करणाºया विमानांना सरासरी एक तासाचा उशीर होत होता. उड्डाण करणाºया एकूण विमानांपैकी तब्बल ६३ टक्के म्हणजे, २८७ विमानांना हा उशीर झाला. एका विमानाचे उड्डाण रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.धुके किंवा पावसाळी वातावरणासारख्या कमी दृश्यमानता असलेल्या प्रसंगी विमानांना धावपट्टीवर उतरण्यासाठी आयएलएस प्रणालीचा चांगला उपयोग होतो. ज्या वेळी पायलटला धावपट्टी दिसत नसते, त्या वेळी या प्रणालीच्या माध्यमातून रेडिओ सिग्नलचा वापर करून, पायलटला जमिनीपासूनचे विमानाचे अंतर याची माहिती दिली जाते, त्यामुळे विमान यशस्वीरीत्या धावपट्टीवर उतरविण्यास पायलटला साहाय्य मिळते. १७ मेपासून आयएलएस प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू असल्याने, मुंबई विमानतळावरील हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. दररोज अनेक विमानांना सरासरी अर्धा ते पाऊण तास उशीर होत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता विमानतळावरील सूत्रांनी वर्तविली आहे. तोपर्यंत विमानवाहतूक विस्कळीत राहणार असल्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात मान्सूनपूर्व कामासाठी मुख्य धावपट्टी सहा तासांसाठी बंद करण्यात आली होती, त्या वेळी २०० विमाने रद्द करण्यात आली होती. मुंबईतील मुख्य धावपट्टीवर एका तासामध्ये ४८ विमानांचे उड्डाण, लँडिंग करण्याची क्षमता आहे, तर पर्यायी धावपट्टीवर तासाला ३५ विमानांचे परिचालन करण्याची क्षमता आहे. आयएलएस प्रणालीतील ८० टक्के सुधारणा झाली असून, २ जूनपर्यंत परिस्थिती सामान्य होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. सुधारित आयएलएस प्रणाली कार्यरत झाल्यानंतर मुंबई विमानतळावर विमानांना होणारा विलंब टळेल, असा दावा करण्यात येत आहे.

टॅग्स :मुंबईबातम्या