Join us  

महात्मा फुले नगराला ‘वनवास’; नागरी सेवा-सुविधांचा बोजवारा, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 6:32 AM

मानखुर्द येथील महात्मा फुले नगर क्रमांक दोनमधील रहिवासी नागरी सुविधांविना हैराण झाले आहेत. विभागाला पुरेसा पाणीपुरवठा होत नसून नागरिकांना एक ड्रम पाण्यासाठी दीड तास ताटकळत उभे राहावे लागत आहे.

- अक्षय चोरगेमुंबई : मानखुर्द येथील महात्मा फुले नगर क्रमांक दोनमधील रहिवासी नागरी सुविधांविना हैराण झाले आहेत. विभागाला पुरेसा पाणीपुरवठा होत नसून नागरिकांना एक ड्रम पाण्यासाठी दीड तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. तसेच गेल्या पंधरा वर्षांमध्ये येथे रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. स्वच्छतागृहांची व्यवस्था पुरेशी नाही. सुविधांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तोंडी आणि लेखी तक्रारी दिल्या आहेत. मात्र कार्यवाही काहीच झालेली नाही. परिणामी आता वैतागलेल्या रहिवाशांनी ‘महात्मा फुले नगर विकणे आहे...’ असा फलक नगराच्या प्रवेशद्वारावर दर्शवीत लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदविला आहे.महात्मा फुले नगर क्रमांक दोनमध्ये १ हजार २०० हून अधिक झोपड्या आहेत. चार हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या भागात दोन इंच व्यासाच्या एका लहान पाइपलाइनने पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक गल्ली आणि चाळींमध्ये एक नळ जोडला आहे. प्रति २० कुटुंबांमागे एक असे अनेक सार्वजनिक नळ जोडलेले आहेत. दररोज सायंकाळी साडेसहा वाजता दोन तासांसाठी विभागात पाणी येते. त्यामध्ये सुरुवातीचा अर्धा तास गढूळ पाणी येते. एका नळावर दीड तासात वीस कुटुंबांना पाणी भरायचे असते. त्यामुळे पाण्याअभावी महात्मा फुले नगरवासी त्रस्त झाले आहेत. चार महिन्यांपूर्वी विभागामध्ये चार इंच व्यासाच्या नव्या पाइपलाइनची जोडणी देण्यात आली. मात्र जोडणी झाल्यानंतर काही दिवसांनी नव्या लाइनमधून गढूळ पाणी येत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. अनेक वेळा पाण्याला गटाराच्या पाण्याइतका दुर्गंध येतो. त्यामुळे हे पाणी वापरताही येत नाही, असे स्थानिक रहिवासी सद्दाम नावदगी यांनी सांगितले. पाण्यासाठी नागरिकांना जवळच असलेल्या मानखुर्द गावात जावे लागते. प्रत्येक घरातील किमान दोन व्यक्ती दररोज कामातून, अभ्यासातून वेळ काढून पाणी भरण्याचे काम करत आहेत, असे नावदगी यांनी सांगितले.पावसाळ्यातगंभीर परिस्थितीमहात्मा फुले नगरचा परिसर हा सखल भाग आहे. परिणामी पावसाळ्यात येथे पाणी साचते. सलग तीन तासांहून अधिक वेळ पाऊस पडला तर रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी शिरते. २६ जुलै २००५ आणि यंदाच्या २९ आॅगस्ट रोजी झालेल्या पावसातही महात्मा फुले नगरमधील घरे पाण्याखाली गेली होती. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी शिरणे हे नित्याचेच झाले आहे. सलग दोन तास पाऊस पडला तरी सुरक्षिततेसाठी महात्मा फुले नगरमधील वीज पुरवठा खंडित करावा लागतो.स्वच्छतागृह नाही१२ वर्षांपूर्वी विभागात तीन स्वच्छतागृहे होती. २६ जुलैच्या मुंबईत झालेल्या पावसात फुले नगर पाण्याखाली बुडाले; तेव्हा एका स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली. तेव्हापासून हे स्वच्छतागृह बंद आहे. दुसरे स्वच्छतागृह महापालिका निवडणुकांपूर्वी बंद करण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेचे कारण सांगत आणि जुने स्वच्छतागृह पाडून तेथे चांगले नवे स्वच्छतागृह बांधून देऊ, असे सांगत ते स्वच्छतागृह पालिकेकडून बंद करण्यात आले. त्यामुळे ४ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महात्मा फुले नगरात फक्त एकच स्वच्छतागृह आहे.एका शौचालयामध्ये दोन विभाग करून एक विभाग महिलांच्या वापरासाठी आणि एक विभाग पुरुषांसाठी आहे. त्यामुळे तब्बल तासभर रांगेत उभे राहूनही नंबर येत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे नागरिक मानखुर्द गाव अथवा मानखुर्द पश्चिमेकडील स्वच्छतागृहांमध्ये जातात. परंतु मानखुर्द गावामधील आणि पश्चिमेकडील स्वच्छतागृह महात्मा फुले नगरापासून अर्धा आणि एक किलोमीटर दूर अंतरावर आहेत.रस्ते नाहीतमहात्मा फुले नगरमध्ये रस्ते नाहीत. गेल्या पंधरा वर्षांत रस्त्यांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. महात्मा फुले नगरमध्ये जाण्यासाठी पायी अथवा दुचाकीवरून जावे लागते. ज्या पायवाटा आहेत, त्यांची पावसाळ्यात दुरवस्था होते. चिखल आणि खड्ड्यांमधून वाट काढत लोकांना ये-जा करावी लागते.सुरक्षेचा प्रश्नमहात्मा फुले नगर हे मानखुर्दच्या जुन्या रेल्वे स्थानकाला लागूनच आहे. जुन्या रेल्वे स्थानकावर दररोज सकाळी एक लोकल येते. त्यानंतर दिवसभर हे स्थानक गर्दुल्ल्यांचा अड्डा बनते. त्यामुळे चोरी, मारामारी आणि रात्रीच्या वेळी लुटालुटीच्या अनेक घटना येथे घडल्या आहेत, असे येथील स्थानिकांनी सांगितले. विभागात एक पोलीस बीट चौकी आहे. ती नेहमी बंद असते. आठवड्यातून एकदा-दोनदा पोलीस येथे येतात. दहा-पंधरा मिनिटे थांबतात आणि निघून जातात, असे स्थानिकांनी सांगितले.रेल रोको : मानखुर्द पश्चिमेकडून पाइपलाइनची व्यवस्था करता येऊ शकते. परंतु, पाइपलाइन टाकण्यास रेल्वे प्रशासनाने विरोध केला. त्यामुळे वर्षभरापूर्वी महात्मा फुले नगरमधील रहिवाशांनी रेल रोको आंदोलन केले. परंतु, प्रशासन जागे झालेले नाही.रस्ते नाहीत, तसेच येथे पथदिवे नाहीत. सूर्यास्तानंतर विभागात अंधार असतो. त्यामुळे महात्मा फुले नगरमध्ये सुरक्षिततेची बोंब आहे. विभागात दिवाबत्तीची व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक करत आहेत.तर महात्मा फुले नगरमध्ये एक प्रमुख नाला आणि संपूर्ण विभागात गटारे आहेत. वर्षातून एकदा किंवा दोनदाच त्यांची सफाई केली जाते. घरांसमोरील गटारांची सफाई रहिवासी स्वत:च करतात.विभागात पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नवी पाइपलाइन मंजूर करून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. नवी पाइपलाइन ही मानखुर्द गावातून महात्मा फुले नगरात जोडायची आहे. परंतु, मानखुर्द गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांच्या विरोधामुळे हे काम रखडले आहे. परंतु, ते काम पूर्ण केले जाईल. मानखुर्द पश्चिमेकडून पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या कामासाठी रेल्वे प्रशासनाच्या परवानगीची गरज आहे. रेल्वेकडून परवानगी मिळत नसल्याने मानखुर्द पश्चिमेकडूनही पाण्याची जोडणी करता येत नव्हती. रेल्वे प्रशासनाकडून त्यासाठी परवानगी लवकरच मिळवून महात्मा फुले नगरचा पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल. विभागात अनेक नागरी समस्या आहेत. त्यामुळे महात्मा फुले नगरमधील रहिवाशांचे जवळच्याच महाराष्टÑ नगरमध्ये पुनर्वसन करण्यासाठी रेल्वेने अनुकुलता दर्शवली आहे. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. - राहुल शेवाळे, खासदारविभागामध्ये पाण्याची समस्या आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी विभागात नव्या पाइपलाइनची जोडणी करण्यात आली आहे. गेले काही दिवस गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. येत्या आठवड्यात तो प्रश्न कायमचा सोडविण्यात येईल.- अनिता पांचाळ, नगरसेविकालोकप्रतिनिधींनी फक्त आश्वासने दिली आहेत. परंतु, सुविधा दिल्या नाहीत. निवडणुकांपूर्वी लोकप्रतिनिधींनी विभागाला भेट दिली. मात्र निवडणुकांनंतर कोणीच विभागात आले नाही. लोकप्रतिनिधींकडे तोंडी आणि लेखी अनेक वेळा मागण्या मांडण्यात आल्या. मात्र प्रश्न मिटलेले नाहीत.- नितेश वायदंडेपाण्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. स्वच्छतागृह आणि रस्तेही नाहीत. नागरिकांची गैरसोय होत आहे. अनेक लोकांच्या कुटुंबातील लहान मुलेही अभ्यास बाजूला सारून पाण्यासाठी रांगा लावतात.- नंदा चव्हाण

टॅग्स :मुंबई