Join us  

मुंबापुरीत ‘महाराष्ट्र दिना’चा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 2:41 AM

महाराष्ट्र दिनानिमित्त शहर - उपनगरात विविध संस्था, प्रतिष्ठान यांच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मुंबईकरांनी सामाजिक संदेश देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने बुधवारी महाराष्ट्र दिन साजरा केला

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त शहर - उपनगरात विविध संस्था, प्रतिष्ठान यांच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मुंबईकरांनी सामाजिक संदेश देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने बुधवारी महाराष्ट्र दिन साजरा केला. गिरणगावातील काही चाळींमध्ये रहिवाशांनी एकत्र येत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून महाराष्ट्र दिन साजरा केला. वांद्रे पश्चिम येथील सेंट टेरेसा बॉइज हायस्कूलमध्ये शाळेच्या पर्यवेक्षिका जसिंथा लोपीस यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक फादर निकी, उपमुख्याध्यापिका मारिया पॉल, सीवीओ फादर विनोद उपस्थित होते. याप्रसंगी, इयत्ता आठवीतील विद्यार्थी श्रवण गावडे याने महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विशद केले तर शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून ‘ने मजसी ने परत मातृभूमीला... सागरा प्राण तळमळला’ हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले गीत गायले व सर्वांत शेवटी शाळेचे मुख्याध्यापक फादर निकी यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे वैशिष्ट्य सांगून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश हिरवे यांनी केले.

कामगार दिनानिमित्त फोर्ट येथील शासकीय दंत महाविद्यालयात बाह्यरुग्णालय आणि आंतररुग्णालय, आॅपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांनी साफसफाई केली. सकाळी ७ वाजल्यापासून डॉक्टरांनी सफाई करण्याचे काम हाती घेतले. त्यानुसार डॉक्टर्स, परिचारिका, आणि अन्य कर्मचारी या सर्वांनी हाती झाडू घेऊन रुग्णालयाची सफाई केली.

या उपक्रमाविषयी शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विवेक पाखमोडे यांनी सांगितले की, महाराष्ट्र दिनानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना सुट्टी असते. त्यामुळे या दिनाचे औचित्य साधून डॉक्टर्स, स्टाफ, नर्सेस आणि विद्यार्थ्यांना परिसर विभागून देण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येकाने हातात झाडू घेऊन रुग्णालय परिसरात स्वच्छता केली.

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बुधवारी सकाळी उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक व संचालक अन्वर अहमद यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तर वांद्रे येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मुख्यालयातही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. गोराई येथे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव (पश्चिम) एम.के. राव यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. अंधेरी पूर्व विधानसभेत मनसेतर्फे गिरणी कामगारांचा सत्कार करण्यात आला. मुंबईत संध्याकाळीही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

टॅग्स :महाराष्ट्र दिनमुंबई