दासगांव : डोंगरी सर्वा... दिसे धन्या हिरवा काय करु तुझ्या संसाराला... म्हतारा बैल तुझ्या नांगराला... टायसनचा पेंढा खायाला... अशी गीते सध्या रानावनात काम करणाऱ्या महिलांच्या तोंडी आहेत. पावसाच्या हजेरीने भात रोपांची पेरणी करण्यात आली होती. आता भातपिकाच्या लावणीला सुरुवात झाली आहे. संपूर्ण कोकणामध्ये प्रामुख्याने भातपीक खरीप हंगामात घेतले जाते. सध्या तालुक्यात भातपिकाच्या लावणीला वेग आला आहे. महाड तालुक्यात पिढ्यानपिढ्या चालत आलेली पध्दत वापरली जाते. यंदा रोहिणी नक्षत्रात सुध्दा पाऊस पडला आणि पावसाचे मृग नक्षत्रसुध्दा चांगले जात आहे. त्यामुळे भाताची आवण (तरवा) योग्य झाल्याचे पाहून शेतकरी लावणीच्या कामाला जुंपला आहे. भातलावणी हा कोकणातील बळीराजाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे बळीराजा आपल्या कुटुंबातील लोकांसह गावातील इतर कुटुंबातील लोकांनाही भातलावणीच्या कामात सहभागी करुन घेत असतो. या पध्दतीला बदली कामगार पध्दत म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे शेतमजूर उपलब्ध झाल्यास २५० ते ३०० रुपये मजुरीवर भातलावणीसाठी घेण्यात येतो. सध्या बळीराजा आनंदात असून भातलावणीच्या कामाची लगबग सुरू आहे.यंदा समाधानकारक पाऊस पडला असला तरी मधूनच अवेळी पाऊस पडून पिकाची हानी करण्याचे काम दरवर्षी होत असते तरीही त्यातून उभारी घेत येथील बळीराजा शेतीच्या कामात मग्न होतो. दरवर्षी येणाऱ्या संकटाची पर्वा न करता सध्यातरी बळीराजा आपल्या लावणीच्या कामात मग्न असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यंदा चांगले पीक हाती येईल, अशी बळीराजाला अपेक्षा आहे. (वार्ताहर)अशी होते लागवड : भातलावणीला खलाटीच्या भागात चिखल करण्यासाठी पावसाच्या पाण्याची आवश्यकता असते. हे पाणी डोंगर माथ्यावरुन वाहळातून आलेले असते ते आपल्या अन्य शेतकरी बांधवांच्या सहाय्याने बांध फोडून जिथे भातलावणी सुरू असते तिथे आणले जाते. त्या ठिकाणी एक किंवा गरजेनुसार दोन, तीन नांगर एकत्रित जुंपून चिखली करण्याचे काम करण्यात येत असते. ही मशागत होत असताना या चिखलीतच महिला भाताची लावणी करतात.
महाड तालुक्यात भातलावणीची लगबग
By admin | Updated: July 3, 2015 23:00 IST