मुंबई : लोकलसह अन्य वाहतूक सेवांचे वेळापत्रक प्रवाशांना सहजरीत्या तपासण्यासाठी उपलब्ध असलेले एम-इंडिकेटर आता नव्या रूपात उपलब्ध होणार आहे. उशिराने धावणारी ट्रेन, रद्द होणाऱ्या सेवा याची माहिती प्रवाशांना उपलब्ध होण्यासाठी एम-इंडिकेटरमध्ये रेल्वे प्रवाशांसाठी चॅटची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. यावर प्रवाशांनीच माहिती दिल्यावर अन्य प्रवाशांना ट्रेनची सद्य:स्थिती समजण्यास मदत मिळेल. याविषयी एम-इंडिकेटरचे संस्थापक सचिन टेके यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. एम-इंडिकेटर या अॅपमध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी दहा महिने त्याचा अभ्यास करण्यात आला. प्रवाशांना हे अॅप वापरण्यासाठी अधिक सोयीचे कसे होईल, यासाठी प्रयत्न केला गेल्याचे टेके यांनी सांगितले. यापूर्वी फक्त ट्रेनच्या वेळा प्रवाशांना माहिती पडत होत्या. या इंडिकेटरमध्ये आता प्रवाशांसाठी ‘ट्रेन चॅट’हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून त्यामुळे प्रवाशांना ट्रेनची सद्य:स्थिती समजण्यास मदत मिळेल. ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड, त्या रद्द होणे याबाबत चॅट केल्यावर अन्य प्रवाशांनाही त्याची माहिती मिळणार आहे. ट्रेनचे लाइव्ह स्टेटसही प्रवाशांना इंडिकेटरवर समजेल. पश्चिम आणि मध्य रेल्वेवर धावणाऱ्या लोकलची सद्य:स्थिती यावर दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच कोणत्या प्लॅटफॉर्मवर लोकल जाणार किंवा कोणत्या दिशेला प्लॅटफॉर्म येणार याची माहितीही देण्यात येणार आहे. लोकलच्या माहितीसाठी वेगळी रचना यात करण्यात आली आहे. ट्रेनप्रमाणे लाइव्ह स्टेटसची योजना बेस्ट बससाठीही सुरू करणार असल्याचे टेके यांनी सांगितले. हे बदल लवकरच केले जाणार आहेत. (प्रतिनिधी)