Join us  

खोणीतील लॉटरी विजेते अद्याप घरापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 1:45 AM

पोलिसांत तक्रार : गृहनिर्माण मंत्र्यांच्या आदेशानंतरही कारवाई नाही

मुंबई : खोणी पलावा सिटीमध्ये सुरू असलेल्या गृहप्रकल्पातील २० टक्के घरे खासगी विकासकाकडून म्हाडाला देण्यात आली आहेत. म्हाडामार्फत या घरांची लॉटरी काढून विजेत्यांची पात्रता निश्चिती करून ताबा घेण्यासाठी त्यांना देकार पत्रही दिले. मात्र अद्याप या विजेत्यांना विकासकाने ताबा दिलेला नसून ही घरे परस्पर विकली असल्याचे समोर आले आहे. यामुळे या विजेत्यांनी या विरोधात डोंबिवलीतील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंद झाली आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विकासकावर कारवाई करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वीच दिले आहेत, मात्र अद्याप यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने लॉटरीमध्ये विजेता ठरूनही विजेते अद्याप घराच्या ताब्यापासून वंचितच आहेत.

२०१८ साली म्हाडाच्या कोकण मंडळाने कल्याण येथील मौजे अंतराळी खोणी येथील पलावा सिटी येथील घरांची लॉटरी काढली होती. लॉटरीमध्ये विजेते ठरलेल्यांना म्हाडाने देकारपत्रही दिले. तसेच नियमानुसार म्हाडा आणि विकासकाकडे अनामत रक्कमही भरण्यात आली आहे. देकारपत्रामध्ये घर कुठे, कितव्या मजल्यावर, कोणते आहे याचाही उल्लेख करण्यात आला आहे. मात्र या विजेत्यांना घराचा ताबा मिळालेला नाही. विकासकाने घरे परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विकली आहेत, आम्ही विजेता ठरूनही अद्याप घराचा ताबा मिळालेला नाही. म्हाडाने फसवणूक केली असल्याचा आरोप करत २० विजेत्यांनी डोंबिवलीतील मानपाडा येथे तक्रार दाखल केली आहे.कारवाईचे दिले होते आश्वासन!खोणी येथील विजेत्यांची पात्रता निश्चिती झाल्यावर म्हाडाने पात्र देकारपत्र दिले, मात्र हे विजेते घराचा ताबा घेण्यास गेले असता विलंब झाल्याचा नियम दाखवत विकासकाने ताबा देण्यास नकार दिला. याबाबत या विजेत्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. म्हाडा लॉटरीतील विजेत्यांची घरे विकासकाकडून परस्पर विकणे ही मोठी गंभीर बाब असून सोडतीतील विजेत्यांनी तशी तक्रार केल्यास विकासकाविरोधात कडक कारवाई केली जाईल, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले होते. तसेच त्यांनी विकासकावर कारवाई करण्याचे आदेश या वेळी दिले होते, मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. 

टॅग्स :म्हाडा