Join us  

तमिळनाडूच्या मायलेकींकडून मुंबईतील सराफांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 1:27 AM

दागिन्यांच्या वाटणीच्या वादातून अडकल्या पोलिसांच्या जाळ्यात : साथीदार पसार

मुंबई : जुन्या दागिन्यांऐवजी नवीन सोन्याच्या दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने मुंबईतील सराफांना लुटणाऱ्या तमिळनाडूतील मायलेकींचा एलटी मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तुलसी उर्फ लक्ष्मी नायडू (५०) आणि मुलगी जया (२६)सह अरमुगम नायडू (५५) अशा तिघांना या गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे, तर सीता नायडू ही महिला पसार आहे. काळबादेवी येथील एका सराफाच्या फसवणुकीनंतर मिळालेल्या दागिन्यांच्या वाटणीतून सीता आणि या मायलेकींमध्ये वाद झाला. याच वादामुळे या मायलेकी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या.या मायलेकी तमिळनाडूच्या सेलम या भागातील रहिवासी आहेत, तर अरमुगम हा सायन परिसरात राहतो. तो त्यांना मुंबईतील सराफांची माहिती पुरवित होता. त्यानुसार, या मायलेकी यातील पसार आरोपी सीता नायडूच्या मदतीने सराफांना जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन दागिने खरेदी करण्यास जात असे. पुढे व्यवहारादरम्यान वाद घालून हातचलाकीने बनावट दागिने सोपवून तिघीही पसार होत असे.१० मे रोजी या तिघींनी काळबादेवी परिसरातील दिनेश जैन यांचे दुकान टार्गेट केले. या वेळी दुकानात तेथील कर्मचारी ओमदान राजूदान चारण (२४) होते. जुने सोन्याचे दागिने विकून नवीन दागिने खरेदी करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. स्वत:कडील साडेएकोणीस तोळ्यांचे दागिने सराफाला दाखविले. त्यातील काही दागिने खरे होते. त्यामुळे जैन आणि चारण यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. त्या बदल्यात त्यांनी सराफाकडून १५ तोळ्यांचे नवीन दागिने खरेदी केले. पुढे व्यवहारादरम्यान वाद घालून त्यांनी दागिने बदलले आणि सराफाचे १५ तोळे सोन्याचे दागिने घेऊन त्या निघून गेल्या. या प्रकरणी त्यांनी एलटी मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.१२ तोळे सोने जप्तनायडू मायलेकींकडून १२ तोळे सोने आणि १० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे, तर उर्वरित दागिने आणि १५ हजार रुपयांची रोकड सीता घेऊन गेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.अशी झाली अटकएलटी मार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तिघीही ज्या टॅक्सीतून आल्या, त्या टॅक्सीचा क्रमांक मिळविला. त्यानुसार, टॅक्सीचालकाकडे चौकशी केली असता महिलांना मानखुर्द येथून आणल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी मानखुर्द परिसरात मोर्चा वळविला. तेथून दोघींना अटक केली.मायलेकींनी अनेक सराफांना गंडविल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या १ मे पासून मानखुर्द येथील झोपडपट्टीत भाड्याने राहात होत्या. टार्गेटची माहिती मिळताच मुंबईत यायच्या. झोपडपट्टीत भाड्याने घर घ्यायचे. काम होताच तमिळनाडूला रवाना व्हायचे, अशी त्यांची पद्धत होती. मात्र, यंदा सीता आणि या मायलेकींत वाटणीमुळे वाद झाला. सीता अर्धे पैसे घेऊन निघून गेली. त्या तिची वाट बघत थांबल्या होत्या. आणि त्यामुळेच पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या.

टॅग्स :दरोडा