बोर्डी : करंज वृक्षाच्या पानांमध्ये फळे पिकविणे आणि वातावरणात गारवा निर्माण करण्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे. फळबागायतीसह पर्यटन, बुरूड, रोजगार आदी व्यवसायाला चालना मिळून आर्थिक उलाढाल होते. सध्या करंज वृक्ष बहरला असून अनेकांना आकर्षित करीत आहे.डहाणू तालुक्याला पश्चिम घाट आणि समुद्रकिनारा लाभल्याने येथे नारळ, चिकू, आंबा, लिची, फणस आदी फळबागायती मोठ्या प्रमाणावर आहे. घोलवड, रामपूर, चिखले, नरपड, कोसबाड, बोरीगाव, अस्वाली या गावांना शेती संस्कृतीची समृद्ध परंपरा लाभली आहे. आजही स्थानिक पदवीधर व उच्चशिक्षितवर्ग नोकरी, व्यवसाय सांभाळून शेती करण्याला प्राधान्य देतो. नुकताच आंबा, लिची या मोसमी फळांच्या हंगामाला प्रारंभ झाला असून मुंबई, अहमदाबाद, बडोदा, सुरत बाजारपेठेत निर्यात केली जाते. परगावांतील व्यापाऱ्यांकडून बोर्डीतील फळांना विशेष मागणी आहे. तयार फळांची तोडणी केल्यावर बांबूनिर्मित करंडी अथवा कागदी खोक्यात करंजाच्या हिरव्या पाल्यात पॅकिंग केली जाते. करंज वृक्षाचा हिरवा पाला वाळल्यावर उष्णता उत्सर्जित करतो. त्यामुळे फळे पिकतात. त्याचा नैसर्गिक रंग, गंध, चव कायम राहते. फळे पिकविणाऱ्या रासायनिक पदार्थाच्या वापराअभावी रासायनिक पदार्थ खरेदीचा खर्च वाचून शरीराला अपाय होण्याचा धोका नसतो. ही झाडे परिसरात मोठ्या संख्येने असून उष्म्यापासून थंडावा आणि सौंदर्यात भर पडते. त्यामुळे पर्यटक आकर्षित होत असून स्थानिक आदिवासींना रोजगार, बुरूड व्यवसायाला चालना मिळत आहे. (वार्ताहर)
करंज वृक्षामुळे स्थानिकांना रोजगार
By admin | Updated: May 9, 2015 22:56 IST