Join us  

भारतातील ग्रामीण भागातील राहणीमान खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतातील ग्रामीण भागातील राहणीमान खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक आहे. ग्रामीण भागांमधील घरांमध्ये कधीच घर थंड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतातील ग्रामीण भागातील राहणीमान खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक आहे. ग्रामीण भागांमधील घरांमध्ये कधीच घर थंड करण्याची उपकरणे व उजेडासाठी दिवे लावावे लागत नाहीत. महात्मा गांधीसुद्धा हेच म्हणायचे की, खरा भारत हा ग्रामीण भागात राहतो. शहरी भागातील लोकांनी पाश्चिमात्य राहणीमानाचा अवलंब केल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. म्हणूनच शहरी भागात एसी, कुलर यांसारखी पर्यावरणाला हानी पोहोचविणारी उपकरणे वापरावी लागतात. मात्र ग्रामीण भागातील घरे ही नैसर्गिकरीत्या थंड असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील घरे व राहण्याची शैली ही खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक आहे, असे प्राध्यापक आशिमा बँकर यांनी सांगितले.

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त अनंत नॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने ग्रीन बिल्डिंग या विषयावर ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सांगितले की, इमारतीच्या बांधकामापासून ते कालांतराने ती पाडण्यापर्यंत कशा प्रकारे पर्यावरणाचा विचार केला आहे, म्हणजे ग्रीन बिल्डिंग होय. आज भारतातील शहरांना पर्यावरणाचा विचार करून एका वेगळ्या प्रकारे इमारती उभे करण्याची गरज आहे. ज्या प्रकारे इमारतींना ग्रीन प्रमाणपत्र देण्यात येते, त्याचप्रमाणे आपल्या शहरांना ग्रीन प्रमाणपत्र देण्यायाेग्य बनवायला हवे. ग्रीन बिल्डिंगसाठी ग्राहकांना पर्यावरणपूरक व आकर्षक कल्पना द्यायला हव्यात.

भारताकडे सोलर पॉवर निर्माण करण्याची प्रचंड क्षमता आहे. त्यासाठी भारतात वातावरणही अत्यंत चांगले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आपण यशस्वी ठरत आहोत. अनेक प्रगत देशांमध्ये सोलार एनर्जीचा ८० टक्के वापर केला जातो. मात्र भारत अद्यापही याबाबतीत मागे आहे. सोलर एनर्जीचा वापर हा खर्चिक असल्याने अनेक जण तिचा वापर करण्यास टाळाटाळ करतात. तसेच वाढती लोकसंख्या हेही भारतात सोलार पॉवर अयशस्वी होण्यामागे एक कारण असल्याचे त्यांनी सांगितले.